बारामती – राजकारणात संघर्ष होऊ शकतो; मात्र हा संघर्ष दोन दिवसांचा असतो. उर्वरित 363 दिवस राज्य व देशाच्या विकासासाठी तयार असले पाहिजे. अशी विकासाची जी काही पावले सरकारमार्फत उचलली जातील, त्यांस आमचा पाठिंबा राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिली. ‘पक्षापेक्षा राष्ट्र मोठे, राजनीतीपेक्षा राष्ट्रनीती मोठी. देश पुढे गेला पाहिजे हा आम्हा दोघांचाही एकच ‘मक्सद’ आहे,’ असे मोदींनीही सांगून टाकले.बारामती मध्ये काल मोदी यांचे पवार आणि त्यांच्या पक्षाने जोरदार स्वागत केले
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी बारामतीत प्रचारसभा घेतली होती. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या काका- पुतण्यांवर जोरदार टीका केली होती. “बारामतीला पवार काका-पुतण्याच्या गुलामगिरीतून मुक्त करा,‘ असे जाहीर आवाहनही त्यांनी सभेत केले होते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठा दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पुणे जिल्ह्यात तयार झाले होते. शनिवारच्या सभेत मात्र नेमके उलट चित्र पाहावयास मिळाले. याआधी पवार यांच्यावर तीव्र टीका करणारे मोदी या सभेत मात्र पवार यांचे गुणगाण गात होते.
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी श्री. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतीविषयक विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून त्यावर जलद निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, “”यंदा ऊस उत्पादक व दुग्ध उत्पादक शेतकरी संकटात सापडलेले आहेत. साखर निर्यातबंदी व दरातील घसरणीने दर कसा द्यायचा, हा प्रश्न आहे. दुधाचे दर 23 रुपयांवरून 18 रुपयांपर्यंत घसरलेत. कधी नव्हे ते जनावरांच्या बाजारात गाई विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महाराष्ट्रात यंदा दुष्काळ आहे. राज्य सरकार प्रयत्न करतेय; पण केंद्राकडून प्रस्ताव देऊनही अद्याप मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत.‘‘ धनगर समाजाला आदिवासींसारख्या सुविधा मिळव्यात यासाठी आरक्षणासाठी लोकसभेत पावले उचलावीत, अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.
तुम्ही गुजरातेत असताना खूप काम केलेत. कच्छसारख्या वैराण प्रदेशाचा चेहरामोहरा बदलला, अशी मोदींची स्तुती पवारांनी केली. तर मोदी यांनी अनेकांना माहितीही नसेल असे सांगत एक गुपित फोडले. मोदी म्हणाले, ‘गुजरातचा मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक अडचणी यायच्या. केंद्राकडून अनेक अडथळे यायचे. तेव्हा महिन्यातून दोन-तीनदा मी शरदरावांशी बोललो नाही असा एकही महिना जात नसे. केंद्राकडून अडथळे यायचे तेव्हा शरदरावांना मध्ये घालायचो. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तेही मदत करायचे. याबद्दल मी आज शरदरावांचे जाहीर अभिनंदन करतो.’
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या अपयशानंतर महाराष्ट्रात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतही अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. सत्तेत असूनही भाजप शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक देत असल्याबाबतची खदखद शिवसेनेत आहे. तिचाच स्फोट दिल्लीच्या निकालानंतर झाला आणि सुनामीपुढे लाटेचा निभाव लागत नसल्याचे जाहीर वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी भाजपशी असलेल्या अंतर्गद धुसफुसीची जाहीर वाच्यता झाली आहे. परिणामी, राज्यात स्पष्ट बहुमत नसलेल्या भाजपची धास्ती वाढली आहे. त्यातूनच शिवसेनेला शह देण्याचा राजकीय डावही मोदी यांनी बारामती भेटीच्या माध्यमातून खेळला आहे. तुम्ही पाठिंबा काढलात; तरी आम्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने आमचे सरकार शाबूत ठेवू शकतो, हाच संदेश यातून शिवसेनेला देण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे.