पुणे- वाजपेयींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारसह सन २०१४ पूर्वीचे राजकारण आणि २०१४ नंतरचे राजकारण
या मध्ये जमीन अस्मानाचा फरक असून आता देशातील राजकारणात काळाकुट्ट नभ दाटून आले आहे असे सांगत आता
राजकारणाचा संपूर्ण पटच बदलला आहे असे मत जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर आपला
देश वेगळ्या वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरु झाला मात्र त्याला आता वेगळ्या वळणाकडे नेण्याचा प्रयत्न सुरुअ सून
राजकारणाचा नव्याने पट मांडावा लागेल असेही ते म्हणाले.
पुणे नवरात्रौ महोत्सवामध्ये दिला जाणारा यंदाचा ‘महर्षी पुरस्कार’ जेष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना राज्याचे माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन
पाटील, जेष्ठ नेते व माजी आमदार उल्हास पवार, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजाक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल,
माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, विठ्ठल लडकत, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, गोपाल
तिवारी, नरेंद्र व्यवहारे, प्रा. प्र.ल. गावडे, डॉ. विनोद शहा, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्य्क्षा कमल व्यवहारे, पुणे
नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, डॉ. अभिजित वैद्य व सौ. वैद्य आदी यावेळी उपस्थित होते.
शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, चांदीची श्री महालक्ष्मीची मूर्ती, मानपत्र व रोख ११ हजार रुपये असे या पुरस्क्राचे स्वरूप
आहे.
भाई वैद्य म्हणाले, सध्या नवरात्रौ महोत्सव सुरु आहे. देवी दैत्याला मारते हे राजकारणच आहे. राजकारणातही दैत्य
आहेत. त्यामुळे मी राजकारणावर भाष्य करीत आहे. स्वातंत्र्याच्या काळात राजकारणाने संपूर्ण वातावरण भारलेले होते.
तेव्हापासून मी राजकारण पहातोय, अनुभवतोय. आत्ताच्या राजकारणाचा संपूर्ण पटच बदलला आहे. आता अल्पसंख्यांक
भयभीत झाले आहेत. फादर दिब्रिटो, नसुरुदिन शहा यांना भीती वाटणे ही लज्जास्पद बाब आहे. आता तुम्ही आमच्याकडे
या आम्ही तुमच्याकडे येतो असे राजकारण न करता एका उजवी विचारसरणीविरुध्द व दुसर्या बाजूला सर्वांना एकत्र
येवून आघाडी करावी लागेल. काही पक्ष हे सिद्धांतवाडी पक्ष आहेत, कॉंग्रेसलाही त्यांच्या वागण्यातील विचारांचा
फेरविचार करावा लागेल असे ते म्हणाले. कॉंग्रेसला उदारमतवादी धोरणाचाही फेरविचार करावा लागेल. गेल्या तीन
वर्षात १.२५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. असेच धोरण राहिले तर पुढच्या तीन वर्षांत १ कोटी शेतकर्यांनी
आत्महत्या करू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाचे खाजगीकरण झाल्याने त्यामाध्यमातून शिक्षण क्षेत्रात
पुन्हा चातुर्वर्ण पद्धती दुसर्या मार्गाने येऊ घातली आहे. त्याचा कॉंग्रेसने विचार करायला पाहिजे. काळ मोठा
आव्हानात्मक आहे. संपूर्ण वातावरण, दडपशाही, भीतीचे झाले आहे. त्याची जाणीव साहित्यिकांना झाल्याने त्यांनी
आपले पुरस्कार परत केले. राजकारण्यांना उशिरा जाग येते .नेतृत्वासाठी पक्ष हा विचार बाजूला टाकला पाहिजे व या
वातावरणा विरोधात सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाई वैद्य यांनी केलेला काळ्या ढगांचा उल्लेख ही गंभीर बाब आहे. त्यावर विचार व चिंतन
केले पाहिजे. देशात समतेचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला मात्र, त्याला छेद दिला जात आहे.
त्याविरुध्द सर्वांनी एकत्र येवून आंदोलन करावेच लागेल.
भाई वैद्य यांनी आपल्या राजकीय जीवनात वावरताना विचारांशी प्रतारणा केली नाही. तसे केले असते तर त्यांना
राजकीय लाभ उठवत सत्तेपासून खूप काही मिळवता आले असते मात्र त्यांनी तसे केले नाही. सामान्य माणसाच्या
अन्यायाविरुध्द लढण्यासाठी आयुष्य खर्ची करणारे भाई वैद्यआजही आंदोलने करतात. त्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ
नसतो. समाजाचे वाईट होऊ नये असे विचार करणारे भाई वैद्य हे अजातशत्रू आहेत असे गौरोदगार त्यांनी काढले.
उल्हास पवार म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात झोकून दिलेले भाई वैद्य हे व्यक्तिमत्व आहे. ते अजूनही आंदोलने
करतात. ते एक उत्तुंग व स्वच्छ चारित्र्य असलेले नेते आहेत. आंदोलन कोण करतो याला महत्व असते. भाई वैद्य यांनी
आंदोलन केल्यानंतर शत्रूदेखील त्यांच्याबद्दल शंका घेणार नाही. संघटन, प्रबोधन आणि मग आंदोलन या तीन गोष्टी
महत्वाच्या असतात. भाई वैद्य यांनी आयुष्यभर प्रबोधन केले, संघटन केले व मग आंदोलने केली असे ते म्हणाले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले भाई वैद्य हे पुण्याचे वैभव आहे. निष्कलंक,
चारित्र्यवान असलेल्या भाई वैद्यांना निष्कलंक असलेल्या माजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतो आहे
हा दुग्ध शर्करा योग आहे.
मोहन जोशी, अंकुश काकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आबा बागुल म्हानले, विचार, संघर्ष व संघटन अशा त्रिसूत्रीचे दर्शन भाई वैद्य यांच्या
व्यक्तीमत्वात होते. त्यांना हा पुरस्कार देताना आपल्याला मनस्वी आनंद होतो आहे.
मानपत्राचे वाचन प्रा. सविता महाजन यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश सुपेकर यांनी केल तर आभार घनश्याम
सावंत यांनी मानले. शेवटी संपदा वाळवेकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.