नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात रशियाच्या या निर्णयाने खळबळ उडालीय. रशिया सरकारने अधिकृत घोषणा केलीय की एक एप्रिलपासून गॅसोलिन (पेट्रोल) निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे
मध्य पुर्वेत सुरू असलेल्या यु्दधामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. युद्दामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. आता यातच रशियाने घेतलेल्या निर्णयाचा फटका रशियावर अवलंबून असलेल्या देशांना बसणार आहे. यात तुर्की, चीन, ब्राझील, आफ्रिका आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे.
देशांतर्गत बाजारातील इंधनाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी रशियाने हा निर्णय घेतलाय. रशियात पेट्रोलची मागणी वाढली असून सरकारने देशातील नागरीक आणि उद्योगांना पुरेसं इंधन योग्य दरात मिळावं यासाठी निर्यात बंदी घातलीय. इराण अमेरिका युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी रशियाने आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातबंदीमुळे देशातील रिफायनरीमधील साठा सुरक्षित राहील आणि महागाई नियंत्रणात ठेवता येईल.
रशियाकडून थेट पेट्रोलची आयात करणाऱ्या देशांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे चीन, तुर्की, ब्राझील, सिंगापूर या देशांवर निर्यात बंदीचा मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय आफ्रिकेतील अनेक देश स्वस्तातल्या रशियन तेलावर अवलंबून आहेत. आता रशियाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे या देशांना इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागेल. इतर पर्याय या देशांसाठी महागडे ठरणारे आहेत. याचा परिणाम संबंधित देशांमध्ये महागाईवर होऊ शकतो. पेट्रोलच्या किंमतीत वाढही होऊ शकते.
मध्य पुर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे लाल समुद्रातून होणारा व्यापार धोक्यात आला आहे. रशियाने निर्यात बंदी केल्यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. जर ही बंदी जास्त काळ राहिली तर जगभरातील शेअरबाजार आणि वाहतूक खर्च यावर नकारात्मक परिणाम होईल.
भारत एकूण कच्च्या तेलापैकी बहुतांश कच्चं तेल रशियाकडून स्वस्तात खरेदी करते. मात्र रशियाने पेट्रोलवर बंदी घातली आहे. कच्च्या तेलावर नाही. त्यामुळे भारताला आवश्यक असलेलं कच्चं तेल मिळण्यात अडचण येणार नाही. कच्चे तेल खरेदी करून भारतात त्याचं रिफायनिंग होऊ शकते. रशियाच्या या निर्णयाचा थेट भारतावर परिणाम होणार नाही. मात्र कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढल्यास भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

