‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’… जगण्याबद्दलचं तत्वज्ञान अशा सहज सोप्या भाषेत मांडत मराठी कवितेला आणि साहित्याला समृद्ध करणारे कवी मंगेश पाडगावकर यांचे निधन मराठी मनांना चटका लावून गेले. समोरच्या श्रोत्यांच्या काळजाला सहज हात घालेल अशी कविता कशी लिहावी आणि ती कशी सादर करावी याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पाडगावकर. मराठी रसिकांना अनेक अर्थपूर्ण, भावपूर्ण, प्रेमाच्या कविता त्यांनी दिल्या. समाजव्यवस्थेवर मार्मिक भाष्य करणा-या, कोपरखळी मारणा-या मिश्किल कविता त्यांनी दिल्याच सोबतीला डोळ्यात अंजन घालणा-या झणझणीत शब्दांचे वारही त्यांनी केले. प्रत्येक प्रेमी युगलांच्या मनात रुंजी घालणारे अनेक प्रेमगीतेही पाडगावकरांचीच देण. त्यांच्या निधनाने या भावनांचा प्रवासही थांबला असला तरी त्यांच्या कविता आणि गीतांमधून त्यांचं अस्तित्व, त्यांच्या आठवणी कायमच आपल्यासोबत राहतील. त्यांच्या याच कविता आणि गीतांचा प्रवास झी मराठीने ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमामधून मांडला होता. या महान कविला भावपूर्ण आदरांजली म्हणून हा कार्यक्रम येत्या ३ जानेवारीला झी मराठीवरून दुपारी १ वा. प्रसारित करण्यात येणार आहे.
सचिन खेडेकर, अमृता सुभाष, विभावरी देशपांडे, अशोक बागवे यांचं निवेदन आणि सोबतीला कविता वाचन अशी ही मैफील आहे. हृषिकेश कामेरकर, रंजना जोगळेकर, अमेय दाते आणि इतर गायकांनी सादर केलेली ‘शुक्रतारा मंदवारा’, ‘जेव्हा तिची नी माझी’, ‘श्रावणात घननिळा’, ‘जेव्हा तुझ्या बटांना’ यांसारखी एक ना अनेक गाणी यात बघायला मिळतील. पाडगावकरांच्या कवितांचा भावार्थ समजावून सांगणा-या गोष्टी, त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देणारे किस्सेही यातून बघायला मिळतील तेही श्री.पु. भागवत, प्रा. शंकर वैद्य, यशवंत देव सारख्या दिग्गजांकडून. आणि या सर्वांसोबतच खुद्द पाडगावकरांनी सादर केलेल्या कविताही यात बघायला मिळतील हे विशेष. मराठी साहित्यातील या महान कविला त्याच्याच शब्दसुमनांनी वाहिलेली ही आदरांजली त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ठरेल.