पुणे – “”शहरातील अनेकांचे नातेवाईक देश-विदेशात राहतात. येथे नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना अंत्यविधीसाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे रज्जूचक्षू हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे,‘‘ असे मत सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
निनाद संस्थेने वैकुंठ स्मशानभूमीत हा प्रकल्प उभारला आहे. याचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा विभागाचे सहसंघचालक सुहास पवार, माजी नगरसेविका शुभदा जोशी, संस्थेचे संस्थापक उदय जोशी उपस्थित होते.
उदय जोशी म्हणाले, “”अंत्यविधीसाठी येऊ न शकणाऱ्यांना मृतांच्या नातेवाइकांना अंत्यविधी पाहता यावा, यासाठी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प केवळ विद्युतदाहिनीत सुरू केला आहे.‘‘ या प्रकल्पाद्वारे जगातून कोणत्याही ठिकाणाहून आपल्या नातेवाइकांचा अंत्यविधी पाहता येणार आहे. संस्थेतर्फे अंत्यविधीची चित्रफीत पेनड्राइव्हमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.