पुणे : जबड्याची शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साह्याने करणे आता शक्य झाले आहे. पुण्यातील एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयात नुकतीच ही शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टरांनी अत्यंत माफक खर्चात ही शस्त्रक्रिया केली.
रंगूनवाला वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अद्वैत कुलकर्णी व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी बजावून दुर्बिणीच्या साह्याने जबड्याची शस्त्रक्रिया हे संशोधन भारतामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. अद्वैत कुलकर्णी यांनी या यशाविषयी माहिती दिली.
खांदा, गुडघा या अवयवांना जसे जॉइट्स असतात. तसेच ते जबड्यालाही असतात. तोंड उघल्यानंतर कानाच्या खालून येणारा टकटक आवाज हा त्या जॉइंट्सचा असतो. अपघातामुळे अथवा वाढत्या वयामुळे हे जॉइंट्स हलतात. त्यामुळे जबडाही हलतो, अशी समस्या उद्भवल्यास पूर्वी शस्त्रक्रिया करताना ती चिरफाड करून करावी लागत असे. मात्र, ही शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साह्याने अर्थात एंडोस्कोपीने करता येऊ लागली आहे आणि ती ही माफक खर्चात. जर्मन आणि अमेरिकन उपकरणांनी शस्त्रक्रिया होऊ शकत नाही असे लक्षात आल्यावर काही उपकरणे ऐनवेळी तयार करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. अरुणा तंबूवाला आणि सहकार्यांनी मदत केली.
शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. अद्वैत कुलकर्णी म्हणाले, ‘अमेरिका, चीन या देशांमध्ये ही समस्या जुनी आहे. आपल्याकडेही ती आता आढळू लागली असून, तरुणांमध्येही समस्या दिसून येते. हे टाळण्यासाठी सवयी बदलायला हव्यात, जांभई देताना, उलटी काढताना किंवा हसताना काळजी घ्यायला हवी. भारतात पूर्वी शस्त्रक्रिया चिरफाड करून करावी लागे, आम्ही दुर्बिणीच्या साह्याने केलेली ही शस्त्रक्रिया भारतातील पहिलीच शस्त्रक्रिया असावी असा आमचा अंदाज आहे. ’ डॉक्टरांच्या चमूचे महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार, अधिष्ठाता रमणदीप दुग्गल यांनी अभिनंदन केले.


