मॉस्को- भारताचा सच्चा मित्र अशी ओळख असलेल्या रशिया मध्ये योगा हा धर्म कांड असल्याचा ठपका ठेवीत येथे योगा ला बंदी घातल्याचे वृत्त ‘मॉस्को टाइम्स’ने दिले आहे
या वृत्तानुसार,मध्य रशियात महापालिकेच्या दोन स्टुडिओंमध्ये हठ योगाचे प्रशिक्षण दिले जात होते. हे समजताच दोन्ही स्टुडिओच्या व्यवस्थापकांना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पत्र धाडण्यात आले. ‘योग हे एक धार्मिक कर्मकांड आहे. तो जादूटोण्याचा एक प्रकार आहे. अशा गोष्टींचा प्रचार करणं बंद करा,’ असे आदेशच त्या पत्रात देण्यात आले . या वृत्तानुसार, शारीरिक व सांस्कृतिक शिक्षण विभागाच्या प्रमुखांनाही योग शिक्षणापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रशियातील योगप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
रशियासह पाश्चात्य देशांमध्ये हठ योग विशेष लोकप्रिय आहे. जुन्या जमान्यातील रशियन अभिनेत्री इंद्रा देवी हिने भारतीय योगगुरूंकडून हठ योग शिकून घेतला होता. तेव्हापासून रशियात त्या ‘फर्स्ट लेडी ऑफ योगा’ म्हणून ओळखल्या जात होत्या. स्वत: योग शिकल्यानंतर त्यांनी अनेकांना योगाचे प्रशिक्षणही दिले होते. आंतरराष्ट्रीय योगदिनानंतर जगभरात योगाबद्दल आकर्षण वाढत असतानाच भारताचा एकेकाळचा सच्चा मित्र असलेल्या रशियात योगाला विरोध होऊ लागला आहे. ‘योग हा जादूटोण्याचा प्रकार असून तो धर्माशी संबंधित आहे,’ असे म्हणत मध्य रशियात सरकारी मालकीच्या जागा वा स्टुडिओंमध्ये योग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.