पुणे- शिर्डीच्या साईबाबांवर रचलेल्या विविध रचनांचे,त्यांच्या हयातीतील अनेक प्रसंगांचे नाट्यरूपी
सादरीकरण यामुळे श्री गणेश कला क्रीडा रंगमंचाचे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी रात्री बबलू दुग्गल दिग्दर्शित ‘ये है
साई का दरबार’ हा श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाबांच्या
हयातीत शिर्डीमध्ये घडलेल्या प्रसंगांचे नाट्यरूपी सादरीकरण व त्याला बाबांच्या नामस्मरणाची जोड यामुळे
सर्व प्रेक्षकांना १८ व्या शतकात गेल्याचा भास होत होत होता. ‘जब खिडकी खोलु तो तेरा दर्शन हो जाये ’..,,,
‘ओम साई नमो नम:..श्री सद्गुरू साई नमो नमः.., असा साईबाबांचा जयजयकार, खंडोबा रायाचा अविष्कार,
स्पृश्य- अस्पृश्यतेचा भेद नष्ट करणारा प्रसंग, विविध चमत्कार आणि बाबांचा ‘ सबका मलिक एक’चा संदेश
देणाऱ्या नाट्यरूपी प्रसंगांशी समरस होऊन व टाळ्या वाजवून दाद प्रेक्षकांनी दिली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे व राजेंद्र बागुल यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार
करण्यात आला.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनश्याम सावंत यांनी सुत्रसंचालन केले.