डॉ. सावंत यांनी गुरूवारी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढाव बैठक घेतली. त्यात प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू आदी आजारांच्या सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. त्यानंतर डॉ. सावंत यांनी माहिती दिली.
डॉ. सावंत म्हणाले, राज्यात ठाणे, नागपूर, रत्नागिरी आणि पुणे येथे मनोरूग्णालये आहेत. त्यांच्या नुतनीकरणासाठी आणि आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या रूग्णालयांच्या जागावरही अतिक्रमण होत आहेत. त्यासाठी रूग्णालयाच्या संरक्षण भिंतीही उभ्या केल्या जात आहेत. येरवडा येथील रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी निधीही देण्यात आला आहे.
येरवडा येथे काही रूग्ण अनेक वर्षे आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांना स्वीकारण्यात उत्सुक नसतात. अशा रूग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात मलेरिया, डेंग्यू यांच्या रूग्ण संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढेही साथ रोग फैलावले जाऊ नयेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि ड वर्गाची येत्या वर्षात सुमारे दहा हजार पदे भरली जाणार आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही सुमारे 1300 पदे भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, सहसंचालक डॉ. कांचन जगताप, डॉ. संजीव कांबळे, उपसंचालक डॉ. बी.डी.पवार आदी उपस्थित होते.