पुणे-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यास मिळणे, हा मी माझा बहुमान समजतो. बाबासाहेबांनी आपल्याला राज्यघटना दिली आणि सर्व माणसे समान आहेत, ही शिकवण दिली. ही शिकवण आचरणात आणणे आपण आपले कर्तव्य मानले पाहिजे. युद्ध नको बुद्ध हवा, ही आपली घोषणा आहे.त्यानुसार आपल्याला आचरण करायचे आहे, अशी भावना श्री. बापट यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर व्यक्त केली.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला पुण्याची सेवा करण्याची संधी दिली आहे. गेली ४५ वर्षे मी पुण्याच्या समाजकारण व राजकारणात सक्रिय आहे. मी येथेच जन्मलो आणि येथेच वाढलो. पुणेकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. पुण्याच्या प्रश्नांची मला जाण आहे आणि त्यांची सोडवणूक करणे हे माझे कर्तव्य आहे. सर्वांना सोबत घेऊन विकासाचे प्रश्न सोडविणार” असल्याचे प्रतिपादन कॅबिनेटमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.
शुक्रवारी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर श्री. बापट यांचे पहिल्यांदाच पुण्यात आगमन झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुणे रेल्वे स्थानकावर त्यांचे भव्य स्वागत केले. पक्षाचे ध्वज घेऊन अनेक कार्यकर्ते जमा झालेले दिसत होते. भाऊ या नावाने लोकप्रिय असलेल्या श्री. बापट यांचे आगमन होताच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. भगवे ध्वज आणि जयजयकाराच्या घोषणा, अशा वातावरणात बापट यांचे आज पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले.”गिरीश बापट तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “पुणे की ताकद…गिरीष बापट” अशा घोषणांनी पुणे रेल्वे स्थानकाचा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आपले भाऊ कॅबिनेट मंत्री झाले याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. यावेळी नगरसेवक अशोक येनपुरे, दिलीप काळोखे, संदीप खेडकर आदी उपस्थित होते.
रेल्वे स्थानक परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला श्री. बापट यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि समता भूमी येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बापट यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संघाचे पुणे महानगर संघचालक शरद उर्फ बापू घाटपांडे म्हणाले, “श्री. बापट हे संघाचे अनेक वर्षांपासूनचे निष्ठावान स्वयंसेवक आहेत. मोतीबाग शाखेत ते येत असत. त्यामुळे घरात आनंद पसराव त्याप्रमाणे आज मोतीबागेत आनंद पसरला आहे. आता ते कसब्याचे किंवा पुण्याचे राहिले नसून संपूर्ण राज्याचे झाले आहेत. आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे आणि ते ती पार पाडतील, याची आपल्याला खात्री आहे.” यावेळी संघाचे श्री. कैलास सोनटक्के, नगरसेवक योगेश गोगावले, उज्ज्वल केसकर, दिलीप काळोखे आणि अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.