पुणे – मोहसीन मोहंमद सादीक शेख (वय 28, रा. हडपसर, मूळ रा. सोलापूर) या संगणक अभियंत्याच्या खूनप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील आरोपी धनंजय देसाईसह 22 जणांनी पुणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती ऍड. मिलिंद पवार यांनी दिली. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (ता. 10) होणार आहे.
फेसबुकवर महापुरुषांची बदनामी करणारी छायाचित्रे अनोळखी व्यक्तीने टाकल्यानंतर मोहसीन शेख याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय जयराम देसाई (वय 34, रा. पौड, ता. मुळशी) याच्यासह 22 जणांना शेख याचा कट रचून खून केल्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्यात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. तत्पूर्वी देसाई याने उच्च न्यायालयातही जामिनासाठी धाव घेतली होती; परंतु तेथे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. परंतु आता आरोपपत्र दाखल झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. उत्पात यांच्या न्यायालयात देसाई याने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.