पहाट उगवली….लगबग झाली…..निरंजनाचे ताट घेवुन हाती…..आरती सजली….मंगलमय …..जल्लोश झाला…..ढोलताशाच्या गजरात , मोरयाच्या जयघोषात बाप्पांची एन्ट्री… घरोघरी झाली ……!
विघ्नहर्त्या गणरायाचे शहर आणि उपनगरातून तसेच राज्यभर मंगलमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली सकाळी डोक्याला टोपी तर कोणी गणपती बाप्पा मोरयाची फीत बांधून, रेशमी वस्त्र घेऊन गणेशाला आणायला सुरुवात केली.
तर गणेश मंडळाचे मोठे गणपती रस्त्यावरून वाजत गाजत मंडळाच्या दिशेनं निघाली आहेत. यावेळी लहानग्यांचा उत्साह टिपेला पोहोचला होता. फटाक्यांच्या आतीषबाजीने आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाने वातावरण भारले होते. रस्त्यावर गटागटाने लोक मूर्ती आणण्यासाठी जात होते. येतांना एकत्रितपणे वाजत-गाजत मूर्ती आणत होते.
कोकणातही मोठ्या जल्लोषात गणेशाचे आगमन झाले . अगदी सकाळ पासूनच कोकणातील गावागावत गणेश मूर्तीच्या मिरवणुकां काढण्यात आल्या . कोकणात अत्यंत पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून गणेश मूर्तीचं आगमनझालंआहे. दहा दिवस संपूर्ण कोकणात घराघरात हा जल्लोष पहायला मिळेल. तर सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्येही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.सिंधुदुर्गातली डोक्यावरुन गणपती आणण्याची परंपरा आजही जोपासली जाते. तर गेल्या दोन-तीन दिवसात बाप्पाच्या आगमनासाठी लाखोंच्या संख्येत चाकऱमानी कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळं कोकणात प्रत्येक घराला देखाव्याचं स्वरुप आलं आहे.
गणरायाचे आगमन नागपूरकरांना सुखावणारे ठरले आहे. कारण 20 दिवसांच्या खंडानंतर आज सकाळपासूनच नागपुरात संततधार पाऊस सुरु झाला . त्यामुळे वातावरण आनंददायी बनले . या पावसाचा गणपतीच्या आगमनावर काहीसा परिणाम झालेला पहायला मिळाला. आज सकाळी बाप्पाची मूर्ति आणायला गेलेल्या भविकांना काहीसा त्रास ही सहन करावा लागत आहे. छत्र्या आणि प्लॅस्टिक पिशव्यांच्या सहाय्याने गणपतींच्या मुर्तींना घरी आणावे लागले .