हा महाराष्ट्र आमचा … दिल्ली दिलीना , ती पहा, तिथून पेट्रोल -डीझेल -ग्यास च्या किंमती कमी करा , रेल्वे स्वस्त आणि छान बनवा …महाराष्ट्रा कडे आणि महाराष्ट्रातील मुंबईकडे पाहाल तर खबरदार अशा आशयाचा इशारा देत सर्व प्रादेशिक पक्ष आता मोदी आणि भाजपवर तुटून पडले आहेत , मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राची स्वायत्तता जागृत करण्याचा प्रयत्न हि सारी मंडळी करीत आहेत उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजप तर आफ्जाल्खानाची फौज असल्याची टीका केली आहे राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली असताना भाजप नेत्यांना सत्तेची स्वप्ने पडायला लागली आहेत. त्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही निवडणूक आपल्या हाती घेतली असून, राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. खरे म्हणजे देशाचे पंतप्रधान म्हणून प्रचारादरम्यान त्यांनी महाराष्ट्रहित, विकासाचे मुद्दे प्रखरपणे मांडले पाहिजेत. परंतु त्याऐवजी त्यांनी वैयक्तिक पातळीवर विखारी टीका सुरू केल्याने आता विरोधी पक्षांतील नेत्यांनीही म्यानातील तलवारी काढून त्यांच्यावर तुटून पडायला सुरुवात केली आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर कडाडून प्रहार सुरू केलेला असतानाच लोकसभा निवडणुकीत मोदींना डोक्यावर घेऊन त्यांचे सातत्याने गुणगाण गाणारे शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आक्रमक पवित्रा धारण करून ते एकाचवेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर तुटून पडले आहेत. सर्वत्र प्रचार शिगेला पोहोचलेला असताना सर्वच विरोधी पक्षांनी मोदी विरोधात रान उठविल्याने आता भाजपचीच कोंडी झाली आहे.
ही अफजलखानची फौज
तुळजापूर : एकीकडे भाजपने शिवसेनेच्या विरोधात टीका करायची नाही, हे जाहीर केलेले असताना शिवसेना नेते उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर ठाकरी भाषेत तुटून पडत आहेत. आज तुळजापूर येथे झालेल्या सभेत तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांना थेट अफजलखानाची फौज असल्याचे सांगत ही महाराष्ट्र तोडायला आली आहे, असे म्हटले आहे. यातून शिवसेनेच्या विरोधाची तीव्रता लक्षात येते.
मोदी ग्रामपंचायतीचा ही प्रचार करतील
मुंबई : तिकडे सीमेवर जवानांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. अनेकजण शहीद होत आहेत. मात्र, पंतप्रधान इकडे विधानसभेच्या प्रचारात मग्न आहेत. एक तर भाजपकडे आयात केलेले उमेदवार आहेत. या उमेदवारांची यादी वाचून दाखवत हे असेच सुरू राहिले, तर पंतप्रधान मोदी यांना नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रचाराला यावे लागेल, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोदी यांना जोरदार टोला लगावला.
मोदींना महाराष्ट्राबद्दल आकस
नंदूरबार : १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची वल्गना करणारे मोदी १०० रुपयेही आणू शकले नाहीत. उलट ते पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळविण्याचे काम करीत आहेत. पालघरमधील सागरी सुरक्षा अकादमी प्रकल्प द्वारकेत नेला. तसेच सरसंघचालकांचे भाषण थेट प्रक्षेपित करून त्यांनी देशाची सत्ताच रा. स्व. संघाच्या ताब्यात देण्याचा घाट घातला आहे, त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस आहे, असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
प्रादेशिक पक्षांना
संपविण्याचा डाव
सोलापूर : भाजप, संघ परिवाराला देशात हिंदुत्वाच्या नावाखाली जातीयवादाचा पक्का अजेंडा प्रभावीपणे राबवावयाचा आहे. त्याच भूमिकेतून प्रादेशिक पक्षाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून शरण येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करतानाच माझे नाव घेतल्याशिवाय मोदींना चैनच पडत नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापुरात केली. पंतप्रधानांनी व्यक्तिगत टीका करणे योग्य नाही, परंतु, मोदी व्यक्तिगत टीका करून पदाची प्रतिष्ठा घालवत आहेत.