पुणे—नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी विकासाच्या जनआंदोलनाची घोषणा केली त्यावेळी समाधान
वाटले होते. मात्र, विकास म्हणजे नेमके काय? जनआंदोलन म्हणजे नेमके काय? याबाबत आजपर्यंत स्पष्टता
देण्यात आलेली दिसत नाही, ही स्पष्टता लोकांपुढे यायला हवी असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ
यांनी व्यक्त केले.
‘स्वच्छतेसाठी जनआंदोलन’ या विषयाला समर्पित वनराईच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ
पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते वनराई कार्यालयाच्या ‘इको हॉल’ सभागृहात झाले त्यावेळी
ते बोलत होते. , ‘भारतातील स्वच्छता व पर्यावरण’ याविषयी त्यांनी आपले विचार मांडले. ‘वनराई’चे अध्यक्ष
श्री. रवींद्र धारिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष
अशोक गोडसे, माजी आमदार मोहन जोशी, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर,
भूषण पटवर्धन, डॉ. सतीश देसाई, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे आदी यावेळी उपस्थित होते. या
अंकामध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ
माशेलकर, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर,
ज्येष्ठ विचारवंत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम
ताकवले, ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, ज्येष्ठ पर्यावरणवादी सुनिता नारायण, पुणे मनपा आयुक्त कुणाल
कुमार, ‘आदर्श गाव समिती’चे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सफाई कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर यांसह
अनेक तज्ज्ञ मान्यवरांचे लेख आहेत.
डॉ. गाडगीळ म्हणाले, पर्यावरण व विकास हे परस्पर विरोधी समजण्याचे कारण नाही. या दोन्ही गोष्टींचा
एकत्रित मेळ घातला तर देशाची चांगली प्रगती होऊ शकते. त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर
त्यांनी ‘विकास को जनआंदोलन बनायेंगे’ अशी घोषणा केली आणि आपल्या मनातीलच गोष्ट मोदी करता
आहेत हे ऐकून समाधान वाटले. मात्र, आता तसे वाटत नाही. जनआंदोलन म्हणजे नेमके काय? त्याची
रचना काय असावी? याबाबत तपशीलात जाण्याची आवश्यकता आहे. विकास म्हणजे नेमके काय?
जनआंदोलन म्हणजे नेमके काय? हे लोकांपुढे स्पष्ट करायला हवे.
ते म्हणाले, सह्याद्रीच्या कोकणात मे नेहेमी हिंडतो. कोकणचा भाग हा निसर्गरम्य व स्वच्छ आहे असे
सांगितले जाते परंतु दुर्दैवाने सर्वात जास्त गलीच्छ कोतवले हे गाव कोकणातील आहे. लोटे रासायनिक
उद्योग संकुलाच्या खाली हे गाव आहे. एकेकाळी या गावात स्वच्छ पाणी होते. आता मात्र संपूर्ण गाव व
नदी प्रदुषित आहे. सरकारी पातळीवरच्या अनास्थेचा अनुभव कथन करत डॉ. गाडगीळ म्हणाले, प्रदुषणाने
येथील माशांचे मृत्यू होतात. त्यामुळे दुर्गंधी सुटते व त्याचा येथील लोकांच्या व्यवसायावर परिणाम होतो.
२ ऑक्टोबरला गावागावात शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जाते. परंतु त्याबाहेर २०१०-२०१५ पर्यंत
काहीच फरक पडलेला नाही. आजही तितकेच गलीच्छ पाणी या गावाच्या ओढ्यांमध्ये आणि वसिष्ट नदीत
वाहात आहे. त्यामुळे माश्यांच्या उपलब्ध जातीच नष्ट होत आहेत. ही परिस्थिती सर्व ठिकाणी आहे.
प्रदुषण मंडळ माशे मोठ्या प्रमाणात मरतात याची दाखल सुद्धा घेत नाहीत. प्रदुषण मंडळाने याची
माहिती ठेवायची नाही असे वरूनच आदेश असल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे
वास्तव दडपले जात आहे.
प्रदुषण मर्यादेबाहेर होत आहे. काही उद्योग बोअरवेल घेऊन विषारी जहर त्यामध्ये ओततात. पण आम्ही
बोलायला गेलो की आम्हाला दडपले जाते. याच्यावरती जाहीर चर्चा चर्चा होऊ नये असेही सांगितले जाते
असे सांगून डॉ. गाडगीळ यांनी अलीकडे स्पष्ट वास्तव नुसत दडपायचं नाहीतर त्यावर जाहीर बोलायचेही
नाही हे सध्या देशात घडतय अशी टिप्पणीही केली.
युरोपीय देशांमध्ये, कॅलीफोर्नियामध्ये रचनात्मक गोष्टीबद्दल सार्वमत घेतले जाते. त्यामध्ये बहुमताने
झालेला निर्णय हा बंधनकारक असतो असे स्पष्ट करीत डॉ. गाडगीळ म्हणाले, आपल्याकडे विकेंद्रीकरणाची
प्रक्रिया खूप पुढे गेली आहे. ग्रामसभा, वॉर्डसभेला अनेक अधिकार देण्यात आले आहेत. परंतु नागरिक
त्याचा वापर करीत नाहीत. वॉर्डचे ३० टक्के बजेट हे नागरिक ठरऊ शकतात मात्र जनता याबाबत
अनभिज्ञ आहे. जैवविविधता कायदा आला त्यानुसार गावागावात, नगरपालिका , महानगरपालिकांमध्ये
जैवविविधता व्यवस्थापन समित्या असायला हव्यात. मात्र त्या अद्याप नाहीत. पुणे शहरामध्ये २००२
पासूनच ही समिती असायला हवी होती मात्र आजही ही समिती नाही असे सांगून डॉ. गाडगीळ म्हणाले,
आपले घटनात्मक अधिकार वापरून एकूण व्यवस्था निट चालण्यासाठी सर्वानी प्रयत्न करायला हवेत.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नागरिकांना आपली मते मांडण्यासाठी खूप चांगली सोय झाली आहे.
प्रदुषणमुक्ततेसाठी व निकोप निसर्ग सांभाळण्यासाठी केवळ पुण्यातच नव्हे तर गावपातळीवर जनआंदोलन
उभे करावे असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व जनजागृती या क्षेत्रात वनराई संस्था
करीत असलेले कार्य निश्चितच दिशादर्शक आहे असेही त्यांनी नमूद केले.
श्री रवींद्र धारिया म्हणाले, स्वच्छतेची गोडी लहान मुलांच्या मनात रुजवली गेली तर १५-२० वर्षात भारत
देश स्वच्छ असेल. त्यामुळे सुजलाम सुफलाम भारत या म. गांधींच्या स्वप्नातील भारताकडे जाण्यासाठी
एक पाऊल आपण पुढे गेलो असू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वनराईच्या वतीने ज्या २५० ‘इको
क्लीन’ शाळा आहेत त्यामाध्यमातून या शाळेमधील विद्यार्थी आपल्या परिसरातील कचरा शाळेत गोळा
करून आणतील व त्याची विल्हेवाट लावली जाईल असा उपक्रम हाती घेण्यात येणार असून या
अभियानाच्या माध्यमातून मुले प्लास्टिक कचरा घराच्या बाहेर टाकू नका हा संदेश देतील व लोक त्यांचे
नक्की ऐकतील असे त्यांनी नमूद केले.
अशोक गोडसे व डॉ. सतीश देसाई यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
प्रारंभी या विशेषांकाचे संपादक अमित वाडेकर यांनी अंकाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व
सूत्रसंचालन प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी केले, आभार वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे यांनी
मानले.

