मोदींचा जन्मही नव्हता तेव्हापासून काँग्रेस देशासाठी लढते आहे
औरंगाबाद – यांचा जन्मही नव्हता झालेला , नेहरू – इंदिरा -राजीवजी यांच्या काँग्रेस ने देशासाठी काय केले हे यांना सांगण्याची आवश्यकता नाही काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये केलेल्या कामाचे प्रमाणपत्र आम्हाला कोणाकडून घेण्याची गरज नाही, ते काम देशातील जनतेसमोर आहे, असे सांगत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. मोदींचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून काँग्रेस देशाच्या विकासासाठी झटत असल्याचे त्यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत सांगितले. मराठवाड्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित औरंगाबादमधील आमखास मैदानावरील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते.
मोदी त्यांच्या प्रत्येक भाषणात 60 वर्षांचा हिशेब काँग्रेसला मागत असतात त्याला सोनिया गांधी यांनी त्यांचा नामोल्लेख टाळून प्रथमच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ‘ यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाकरा नांगर धरणाच्या माध्यमातून शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली. जे आज मोठमोठ्या गप्पा मारत आहेत ते फक्त पाच वर्षांचे असताना नेहरुजींनी आधुनिक भारताचा पाया रचला. इंदिरा गांधी यांनी जेव्हा देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करण्यासाठी हरितक्रांती केली तेव्हा हे फक्त 13 वर्षांचे होते.
देशात दुधाची कमतरता दूर करण्यासाठी जेव्हा श्वेतक्रांती केली गेली तेव्हा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत होते, असा प्रहार सोनिया गांधी यांनी केला.राजीव गांधी माहिती तंत्रज्ञानासाठी झटत होते, तेव्हा हेच लोक त्यांची खिल्ली उडवत होते. पण आज त्याच क्रांतीच्या जोरावर हे आपला गाजावाज करुन घेत आहे. राजीव गांधींनी तेव्हा हे काम केले नसते तर यांना आता आपला प्रपोगंडा शक्य झाला असता का? असा सवाल सोनियांनी केला.
सोनिया गांधी यांनी भाजप – शिवसेना सोडल्यास कोणाचेच नाव घेऊन हल्ला चढवला नाही. निवडणुकीच्या तोंडावर आघाडी तोडणार्या राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘कालपर्यंत जे आपल्या सोबत होते त्यांना आज सत्तेची हाव सुटली आहे. त्यासाठी त्यांनी आघाडी तोडली. शिवसेना – भाजप प्रमाणेच त्यांचा उद्देशही फक्त सत्ता आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे झाली. एवढ्या वर्षांमध्ये देशाने आर्थिक, वैज्ञानिक आणि शेतीमध्ये मोठा विकास केल्याचे सोनियांनी सांगितले. देशाचा विकास कोणा एका व्यक्तीमुळे आणि एका दिवसात होत नाही. आज भारत मंगळावर गेल्याचा उल्लेख करुन त्या म्हणाल्या, ‘स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या राजवटीत देशाने प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेने टाकले आहे.’