सध्या मराठी सिनेमांमध्ये अनेक नवनवीन चेहरे पहायला मिळत आहेत. पूर्वीसारखे अमुक एक सिनेमात अमुक एक हिरोईन असली की सिनेमा चालतो हा प्रकार आता मोडीत निघाला आहे. सिनेमाची कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय याच्या जोरावर मराठी सिनेमाला छान दिवस आले आहेत. दिग्दर्शकही सिनेमाच्या मुख्य पात्रासाठी जुन्या चेहऱ्यांपेक्षा नवीन चेहऱ्यांना पसंती देत असल्याचे चित्र सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये पहायला मिळत आहे.
‘गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट’ च्या आलोक श्रीवास्तवा यांची निर्मिती असलेला आणि यु. के. फिल्म्सच्या रेहबर खान यांची प्रस्तुती असलेल्या ‘मिस मॅच’ सिनेमात ‘मृण्मयी कोलवालकर’ हा नवा चेहरा आपल्या भेटीस येणार आहे. मृण्मयीने याआधी लॉरेल, गार्डन सारीज, दिनेश सुटिंगस यासाठी मॉडेल म्हणून काम केले असून ‘मिस मॅच’ हा तिचा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता भूषण प्रधान आणि मृण्मयी कोळवलकर ही फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन गिरीश वसईकर यांनी केले आहे.
‘मिस मॅच’ या सिनेमाच्या टायटल वरूनच आपल्याला हा सिनेमा प्रेम, लग्न या विषयावर भाष्य करणारा असल्याचे समजते. ही कथा आहे एका श्रीमंत घराण्यातील बिझनेसमनच्या मुलीची. आपल्या मुलीचे लग्न हे आपल्या पसंतीच्या तसेच श्रीमंत घराण्यातील अशा मुलाशी व्हावे अशी वडिलांची इच्छा असते. परंतु अरेंज मॅरेज वर आपला विश्वास नसल्याने आपण स्वतःच आपल्या पसंतीचा मुलगा शोधणार आणि त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट त्याच्या असतो. यासाठी ती मुलगी वडिलांकडून दोन वर्षाचा कालावधी घेते. या दोन वर्षात तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळतो का ? की ती अरेंज मॅरेज करते? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘मिस मॅच’ हा सिनेमा पाहावा लागणार आहे.
सिनेमाची कथा-पटकथा- संवाद अशी तिहेरी भूमिका नितीन दिक्षीत यांची आहे. डॉ. आशिष पानट यांनी सिनेमातील गाणी लिहिली असून मानस यांचे संगीत लाभले आहे. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या गायकांनी या सिनेमातील गाणी गायली असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बेला शेंडे, हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. भरणी कानन यांनी सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. अभिनेता भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर यांच्यासोबत उदय टिकेकर, भाऊ कदम, जयवंत भालेकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.
येत्या नोव्हेंबर महिन्यात ‘मिस मॅच’ सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे.