पुणे : मॅगी नूडल्सच्या नमुन्यात परवानगीपेक्षा जास्त शिशाचे (लेड) प्रमाण आढळल्यामुळे राज्यात या पदार्थाच्या विक्रीवर शनिवारपासून बंदी घालण्यात येत असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी जाहीर केले.
पुण्याच्या प्रयोगशाळेत राज्याच्या विविध भागांतून घेतलेले नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. रात्री उशिरा त्याबाबतचा अहवाल शासनाला प्राप्त झाला. बापट यांनी याबाबत तातडीने अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात मॅगी विक्रीवर बंदी घालत असल्याचा निर्णय जाहीर केला. बापट म्हणाले, ” मॅगीच्या काही नमुन्यांमध्ये २.५ ऐवजी शिशाचे प्रमाण वेगवेगळे आढळले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.” अन्न औषध प्रशासन उद्यापासून दुकानांमध्ये तपासणी सुरु करणार आहे. या बंदीचे उल्लंघन करणा-यांवार नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असे सांगून बापट म्हणाले की, खरेदीदाराला पाकिटावरून त्यातील शिसाच्या प्रमाणाविषयी काही कळत नाही. त्यांच्या आरोग्यास शिसाचे जादा प्रमाण असलेली मॅगी घातक असून उद्यापासून कोणत्या विक्रेत्याने कंपनीला किती माल परत पाठविला याचा अहवाल घेतला जाणार आहे. पुण्यातील ६ नमुन्यांपैकी ३ अप्रमाणित पुण्यात घेतलेल्या सहा नमुन्यांपैकी तीन अप्रमाणित आढळले असून उत्तराखंडमधील कंपनीत बनलेल्या एका नमुन्यात २.५५ तर दुस-या नमुन्यात ४.६६ टक्के शिसे आढळले असून गोव्यातील कंपनीच्या नमुन्यात २. ५९ तर अन्य एका नमुन्यात 0.२४ टक्के शिसे आढळले आहे. मोनोसोडियम ग्लुटामेट (एम.एस.जी.)चे प्रमाण मिठाएवढे असावे. एम.एस.जी. असल्याचे पाकिटांवर नमूद आहे, पण प्रत्यक्षात तपासणीत ते आढळले नाही, अशी माहिती बापट यांनी दिली.