पुणे :
रामप्रसाद बिस्मिल यांच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात जीवाची कुर्बाची देणार्या शहीद अश्फाकउल्ला खान यांच्या नावे ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’ने आज पुण्यात ‘शहीद अश्फाकउल्ला खान मेमोरियल ट्रस्ट’ची स्थापना केली. ‘राष्ट्रीय मुस्लिम मंच’चे संस्थापक इंद्रेश कुमार, माजी केंद्रीय मंत्री शहानवाज हुसेन यांच्या उपस्थितीत ही स्थापना झाली.
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक कार्यासाठी हा ट्रस्ट कार्यान्वित करण्यात आला आहे. आज महात्मा फुले सभागृह (फातिमानगर) येथे डॉ. एस. एन पठाण, डॉ. शं. ना. नवलगुंदकर, राष्ट्रीय सहसंयोजक लतिफ मगदूम हे व्यासपीठावर उपस्थित होते. अश्फाकउल्ला खान यांचे त्याच नावाचे नातू अश्फाकउल्ला खान यांचा तसेच दादर-नगर-हवेली मुक्ती स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्याआधी अश्फाकउल्ला खान यांच्या स्मरणार्थ अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले, ‘मुस्लिम समाजात काम करताना शैक्षणिक काम या ट्रस्टमधून सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गरीबांना ‘धान्य बँक’, तलाक मुक्ती, दहशत दंग्यांपासून मुक्ती असे कार्य करीत ‘इन्सान से फरिश्ता’ हा प्रवास सर्वांनी करायचा आहे.’
शहानवाज हुसेन म्हणाले, ‘इंद्रेश कुमार यांच्या मागदर्शनाखाली समाजात सेवेचे काम चालू आहे. शैक्षणिक कामाला चळवळीचे स्वरूप आता येईल. धर्म-जातीवरून भेदभाव भारतात नाही.’
डॉ. एस. एन. पठाण यांनीही असहिष्णुतेचा अनुभव आपल्याला आला नसल्याचे सांगितले. यावेळी क्रांती कारकांच्या कार्याची माहिती देणारे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले.डॉ. मुकुंद हिरवे, मोहमद सलीम अशरफी, डॉ. ताहीर हुसेन, अब्बास अली बोहरा, डॉ. झाकीर हुसेन उपस्थित होते.

