पुणे -मुसळधार पावसामुळे मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली असताना जोरदार पावसामुळे लोणावळा कान्हेजवळ रूळाखालील १८ ते २० मिटरपर्यंतची खडी वाहून गेल्याने पुणे-लोणावळा रेल्वे मार्ग विस्कळीत झाला आहे. यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत.या घटनेचा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर होणार आहे. आणि प्रवाशांना हाल सोसावे लागणार आहेत .
दरम्यान, प्रशासनातर्फे वाहून गेलेल्या रेल्वे रूळावर खडी टकाण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, पावसाचा जोर अधिक असल्याने या कामाला आणखी किती वेळ लागेल याबद्दल काही सांगता येणार नाही.तसेच थांबवण्यात आलेल्या रेल्वे कधी सोडण्यात येतील या बद्दल आता सांगणे शक्य नाही. अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन पाटील यांनी माध्यमांना दिली
शुक्रवारी सकाळपासून पुण्यासह सर्वत्रच मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरही पाणी आले आहे.आणि तेथील वाहतूकही मंदावली आहेछोटे नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी छोटे पूलही पाण्याखाली गेले आहेत. लोणावळ्याच्या तुलनेत कामशेत, तळेगाव, देहूरोड या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसले. कान्हेफाटाजवळील स्मशानभूमीही पाण्याखाली गेली आहे.
शहर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरणाच्या क्षेत्रात आज (शुक्रवार) सकाळी सहा सात वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पानशेत धरण क्षेत्रात पाच तासात 66 मिलिमिटर पाऊस पडला आहे.
दरम्यान पाटबंधारे विभागाच्या वतीने दररोज सकाळी सहा वाजता धरणांचा आढावा घेतला जातो. यावेळी या धरण परिसरात शून्य अशी पावसाची नोंद झाली . परंतु त्यानंतर धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू झाला. खडकवासला येथे सकाळी 9 वाजेपर्यंत 20 मिमि पानशेत येथे 44 वरसगाव येथे 37 टेमघर येथे 27 मिमि पाऊस पडला.
दुपारी बारा वाजेपर्यंत खडकवासला येथे 41, मिमि पानशेत येथे 66, वरसगाव येथे 64, टेमघर येथे 39 मिमि पाऊस पडला.
नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पिपलगावमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गोदा घाट रिकामा करण्याचे आवाहन भाविकांना केले आहे.