‘मुलांना काहीतरी विकायला सांगा’ – डीएसके
डीएसके फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.
पुणे : परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यासाठी जी मेहनत घेतो त्याच बरोबर व्यावहारिक दृष्टीकोनाचा विकास होण्याकरिता मुलांनी कुठल्याही कामाची लाज न बाळगता काहीतरी विकायला पहिजे. मग ते फटाक्यांच्या दुकानात फटाके विकणे असो किंवा सकाळी उठून पेपर विकण्याचे काम असो. मुलांचा यामुळे आत्मविश्वास वाढेलच पण त्याचबरोबर या छोट्या छोट्या गोष्टींमधून जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनही विकसित होईल असा सल्ला प्रसिद्ध उद्योजक डीएसके अर्थात डी. एस. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिला.
डीएसके फाउंडेशनच्या वतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून १०वीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या शिक्षकांचा सत्कार सोहळा २५ जुलै रोजी मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्स येथे पार पडला. यावेळी डीएसके यांचे सुपुत्र अमित कुलकर्णी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. अ.ल. देशमुख, विवेक वेलणकर, अॅड. प्रमोद आडकर तसेच श्याम भुर्के हे उपस्थित होते.
गुणवत्तेच्या स्पर्धेमध्ये मुलांना कधीही ढकलू नका, परीक्षेत गुण किती आहेत यावर सर्वस्व अवलंबून नसतं त्यापेक्षा त्याला जर व्यवहार शिकवला तर तो नक्कीच यशस्वी होईल असे डीएसके पालकांना उद्देशून बोलत होते. त्याच प्रमाणे मुलाने एकपरी अभ्यास केला नाही तरी चालेल पण बाहेर जाऊन खेळायला शिकवा. खो खो, कबड्डी यासारखे ग्राउंड वर खेळणाऱ्या खेळांमुळे मुलं खिलाडू वृत्तीचे होतात व त्यांची प्रकृती देखील उत्तम राहते असेही ते बोलत होते.
वेलणकर म्हणाले, “आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचे आहे याचा अभ्यास आतापासूनच सुरु करा. सगळे ज्या मार्गाला जातात म्हणून आपणही तिकडेच जायला पाहिजे असे करू नका. कुठलेही क्षेत्र निवडताना त्याआधी त्याचा अभ्यास करा, त्याविषयीची पूर्ण माहिती घ्या आणि मगच त्यामध्ये शिक्षण घ्या. ”
यावेळी विविध शाळेतील १२० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांमध्ये ८० टक्के आणि त्याहूनही अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. डॉ. अ. ल. देशमुख, अॅड. प्रमोद आडकर तसेच श्री. श्याम भुर्के यांनीही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम भुर्के यांनी केले.