मुंबई – मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचा व्हिसा घरीच विसरल्याने एअर इंडियाचे विमान तब्बल दीड तास रोखून धरल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जाण्याची घटना मंगळवारी घडली. मात्र मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी परदेशी यांचा हलगर्जीपणा आणि विमानाचा खोळंबा याचा ट्विट वरून साफ इन्कार केला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या शिष्टमंडळासह अमेरिकाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी त्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी हे ही आज एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेकडे जाण्यास निघाले; मात्र त्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ते अमेरिकेचा व्हिसा घरीच विसरले. परदेशी हे व्हीव्हीआयपी असल्याने एअर इंडियाचे विमान तब्बल दीड तास रोखून धरण्यात आले होते. मात्र त्यामुळे इतर सर्वसामान्य प्रवाशांचा खोळंबा केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विमानात बसण्याआधीच्या नियमाप्रमाणे परदेशी यांनी चेक-इन आणि इमिग्रेशन पूर्ण केले होते. अमेरिकेचा योग्य व्हिसा नव्या पासपोर्टवर नसल्यामुळे त्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली. ही बाब बोर्डिंग पॉईंटवर कागदपत्रांची तपासणी करताना अधिकाऱ्यांच्या लक्षात आली.
त्यानंतर धावपळ करत व्हॅलिड व्हिसा स्टॅम्प असलेला जुना पासपोर्ट प्रवीणसिंह परदेशी यांच्या घरून मागवण्यात आला. मात्र तोवर जवळपास एक तास उशीर झाला. त्यामुळे परदेशी विमानात चढेपर्यंत एअर इंडियाचे विमान रोखून धरण्यात आले होते.विमान उड्डाणास उशीर झाल्याच्या कारणांचे उलटसुलट दावे विविध यंत्रणांकडून करण्यात आले आहेत. पासपोर्टच्या गोंधळामुळे दहा मिनिटेच विलंब झाला; परंतु, त्यानंतर विमानास पुन्हा टेकऑफचा स्लॉट मिळण्यास वेळ गेल्याने ते उशिरा झेपावल्याचे स्पष्टीकरण नागरी हवाईवाहतूक मंत्रालयाने दिले; तर, काही तांत्रिक कारणांमुळे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या क्लीअरन्सअभावी विमान ५७ मिनिटे उशिराने झेपावल्याचा दावा ‘एअर इंडिया’ने केला. विमानतळाची व्यवस्था पाहणाऱ्या ‘मियाल’ने मात्र एटीसी किंवा विमानतळ यंत्रणेमुळे विमानास उशीर झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.