मुंबई-येथील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी देण्यात आली. या धमकीमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एका ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली असून, तातडीने न्यायालये रिकामी करून बॉम्बशोधक पथकाद्वारे (BDDS) कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यात केवळ उच्च न्यायालयच नव्हे, तर ‘मुंबईतील सर्व न्यायालये बॉम्बने उडवून देऊ’, असा मजकूर होता. यात प्रामुख्याने वांद्रे आणि किल्ला कोर्टाचाही उल्लेख असल्याचे समजते. ही माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास तातडीने उच्च न्यायालयाची इमारत रिकामी केली. तसेच वांद्रे न्यायालयातही कामकाज स्थगित करून वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अंधेरी न्यायालयात बॉम्ब असल्याची निनावी धमकी मिळाली. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. सध्या न्यायालयाच्या परिसरांना वेढा घालण्यात आला असून, आतून कोणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरून कोणालाही आत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.



