मोदी म्हणजे भूलभुलय्या आहे त्यांनी सोशल मिडियाचा संमोहन शास्त्राप्रमाणे वापर केला धनगर समाजाचे नेते व विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे यांनी मुंडेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली म्हणून म्हणून त्यांचे तिकीट कापले.ज्या गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर हाडाची काडे करून भाजपला महाराष्ट्राच्या कानाकोप-यात नेले त्याच मुंडेंच्या अपघाती मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या अंत्यसंस्काराला वेळ नव्हता. त्याच मोदींना आता बीडसह राज्यभर 25 सभा घ्यायला कसा वेळ मिळाला असा सवाल उपस्थित करीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी मोदींवर टीका केली.
छगन भुजबळ यांनी यवतमाळमध्ये म्हणाले, भारतीय जनता पक्ष अतिशय धोकादायक पक्ष आहे. या पक्षाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हा पक्ष फक्त उच्चवर्णियांचा आहे. ते सर्व समाजाला बरोबर घेत असल्याचे दाखवतात. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. आता तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राज्यातील मंत्र्यांच्या यादीवर लक्ष घाला किंवा अमित शहांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली राष्ट्रीय कार्यकारिणी पाहा. यात बहुजन समाजाला कोठेही स्थान दिले नाही. ज्यांना स्थान दिले ते लोक चांगले आहेत त्याबद्दल तक्रार नाही. पण यांना बहुजन समाजाचे नेते दिसत नाहीत का?. भाजप हा बहुजन समाजाला सत्तेपासून वंचित ठेवणारा पक्ष आहे. आता सांगलीतील उदाहरण पाहा, तेथील धनगर समाजाचे नेते व विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे या बड्या नेत्याचे तिकीट भाजपने कापले. का कापले तर म्हणे शेंडगे यांनी मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर तातडीने दिल्लीत मुंडेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.
आपल्या पक्षाच्या नेत्याबाबत अशी दुर्देवी घटना घडल्यानंतर तशी मागणी केली तर प्रकाश शेंडगेंचे काय चुकले? असा सवाल उपस्थित करून भुजबळ म्हणाले, याच भाजपवाल्यांनी गोपीनाथ मुंडेंना किती त्रास दिला होता याची जाणीव तुम्हा आम्हासह सा-या महाराष्ट्राला आहे. अगदी मंत्रिमंडळात स्थान देताना पण त्यांना यातना दिल्या. ज्या माणसाने आयुष्यभर पक्ष राज्याच्या कानाकोप-याच नेला त्याच मुंडेंना भाजपने अशी वागणूक दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंडेंच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी वेळ मिळाला नाही. पण तेच मोदी आता गोपीनाथ यांच्या बीडमध्ये प्रचाराला गेले आणि आता राज्यात 25 सभा घेणार आहेत अशी घाणाघाती टीका भुजबळ यांनी भाजप व मोदींवर केली. लोकसभा निवडणुकीत भाजपने सोशल मिडियाचा संमोहन शास्त्राप्रमाणे वापर केला आणि यश मिळवले. तरूण मोदींना भुलले पण तरूणांना मोदी काय आहेत ते लवकरच कळेल. सत्तेत आल्यापासून भाजपचा उन्माद वाढला आहे. सगळे मला हवे अशी त्यांची धारणा झाली आहे. त्याचमुळे 25 वर्षापासूनचा मित्र असलेल्या शिवसेनेलाही त्यांनी धोका देत फेकून दिले. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आल्यानंतरही भाजपने सेनेला केवळ एक तेही दुय्यम खाते दिले आहे. बाळासाहेब आज असते आणि केंद्रात एकच मंत्रिपद दिले गेले असते तर बाळासाहेबांनी असल्या सत्तेवर कधीच लाथ घातली असती असेही भुजबळांनी सांगितले.