साई मोहन एन्टरटेनमेंट व गौरव भानुशाली निर्मित ‘मुंगळा’ हा मराठी चित्रपट २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मुंगळा’ चे दिग्दर्शक विजय देवकर यांनी केले असून कथा, पटकथा, तसेच संवादही त्यांचेच आहेत. ‘मुंगळा’ चित्रपट प्रमुख भूमिकेत लोकेश गुप्ते, गणेश यादव, ज्योती जोशी, सुहास पळशीकर, चेतन दळवी मुख्य भूमिकेत असून सोबत राम कदम, मृणाली जांभळे, हरी ठुमके, मुकेश फाळके, भूषण घाडी, दीपक करंजीकर, जनार्दन परब, वैजनाथ चौगुले, गौरी देशमुख, सविता हांडे, आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘मुंगळा’ चित्रपटात ३ गाणी असून आयटम सॉंग अतुल लोहार यांनी संगीतबद्ध केले असून रचना त्यांनीच आहे. सदर गाणे त्यांच्यासोबत विभावरी सातर्डीकरने गायले आहे. इतर गाणी जय गावंडे यांनी संगीतबद्ध केली असून मंदार चोळकर यांच्या रचना आहेत. तसेच नेहा राजपाल व आदर्श शिंदे यांनी पार्श्वगायन केले आहे. चित्रपटात एक भन्नाट आयटम गाणे असून सारा श्रवण हिने त्यावर दिलखेचक असे नृत्य सादर केले आहे. राजेश बिडवे याने नृत्य दिग्दर्शन केले आहे. सध्याचा गाजत असलेला मुद्दा म्हणजे पाणी आणि वीज. संपूर्ण महाराष्ट्रात पाणी पेटले आहे. ते कसे विझवायचे, या प्रश्नाचे उत्तर आगामी ‘मुंगळा’ चित्रपटातून देण्याच्या प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक विजय देवकर यांनी सांगितले.