पुणे -बालुशाही या मिठाईत भेसळ केल्याप्रकरणी येथील विलास माणिकचंद वैष्णव या व्यापार्याला तीन वर्षे साधी कैद व पाच हजार रुपयांच्या दंड अशी शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रेवती कंटे यांनी सुनावली आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्याप्रकरणी व्यापार्याला ऐन दिवाळीच्या तोंडावर शिक्षा झाल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांवर पालिकेच्या आरोग्य विभागाची करडी नजर राहणार असून अनेक व्यापार्यांचे यामुळे धाबे दणाणले आहे.
दरम्यान, या शिक्षेच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सणाच्या कालावधीत व्यापारीवर्गाने शुद्ध व भेसळमुक्त मिठाई व अन्नपदार्थ विक्री करण्याचे आवाहन पालिकेचे आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांनी केले आहे. तसेच दिवाळीच्या काळात नागरिकांनी मिठाई खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी म्हटले आहे.
या खटल्याची अधिक माहिती देताना पालिकेच्या विधी सल्लागार अँड़ मंजूषा इधाटे म्हणाल्या, २ जुलै २00८ रोजी पुणे महानगरपालिकेचे अन्ननिरीक्षक अजित भुजबळ यांनी कसबा पेठ येथील वैष्णव यांच्या वैष्णव स्वीट्स या मिठाईच्या दुकानातून बालुशाहीचा नमुना अन्न भेसळप्रतिबंधक कायद्यांतर्गत विश्लेषणाकरिता घेतला होता. तपासणीअंती या पदार्थामध्ये अँल्युमिनियम फॉइल असल्याचा अहवाल पब्लिक अँनालिस्ट, राज्य आरोग्य प्रयोगशाळा यांनी दिला होता. त्यानुसार भुजबळ यांनी संपूर्ण तपास करून विलास वैष्णव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने वैष्णव यांना तीन वर्षे साधी कैद व पाच हजार रुपयांचा दंड सुनावला. मिठाईसारख्या खाद्यपदार्थावर शुद्ध चांदीचा वर्ख वापरण्यास कायद्याने परवानगी आहे. परंतु आरोपीने शुद्ध चांदीचा वर्ख वापरण्याऐवजी अँल्युमिनियम फॉइलचा वापर केला आहे. अँल्युमिनियम हा पदार्थ मानवी आरोग्यास घातक आहे., असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे. या खटल्यात पुणे महानगरपालिके तर्फे अँड़ सुहास चौधरी व अँड़ प्रशांत यादव यांनी बाजू मांडली व प्रमुख विधी सल्लागार अँड़ इधाटे यांनी मार्गदर्शन केले.