दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या माळीण गावाचे पुनर्वसन करण्यासोबतच माळीण गाव मॉडर्न बनविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गावाचा विकास आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी दिली. तसेच या गावातील १३ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च विद्यापीठ करणार असल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या भूगोल, समाजशास्त्र आणि विज्ञान शाखेचे विभागप्रमुख व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या सहभागाने गावाचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. त्यात भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करून कृषी क्षेत्रात विकास कसा करता येऊ शकतो, त्यावरही भर दिला जाणार आहे. गावाचे आराखड्यानुसार विकास करण्यासाठी सर्व आर्थिक मदत करण्यात येणार आहे. माळीण पूर्णत: मॉडर्न गाव बनविण्यासाठी विद्यापीठाचा प्रय▪राहणार असल्याचे गाडे यांनी सांगितले.
माळीण दुर्घटनाग्रस्त मुलांचा शैक्षणिक खर्च विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. त्या मुलांचे पीएच.डीपर्यंत सर्व शिक्षणाची जबाबदारी विद्यापीठाने उचलली आहे. त्याचबरोबरच विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. त्या दोन मुलांचे विद्यापीठाच्या विद्यार्थी विमा योजनेंतर्गत प्रत्येकी ५0 हजार रुपये संबंधित नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले