Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला झी नाट्यगौरवचा शानदार सोहळा

Date:

2

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

संगीत नाटकांपासून सुरू झालेला मराठी रंगभूमीचा प्रवास आज व्यावसायिक आणि प्रायोगिक या वाटांवरून यशस्वीपणे पुढे जात आहे. आज मराठीमध्ये या दोन्ही रंगभूमींवरून नव्या कल्पना, नवे विषय आणि नवे नाट्याविष्कार प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या सा-या नाट्याविष्कारांची आणि त्याच्याशी संबंधित कलाकार तंत्रज्ञ यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा पुरस्कार सोहळा म्हणजे झी गौरव. यावर्षीपासून मराठी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांसाठी स्वतंत्र असा झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा सुरू करण्यात आला. मराठी नाटकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच स्वतंत्र सोहळा मुंबईत २६ मार्चला नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. नाट्यसृष्टीमध्ये झालेले महत्त्वाचे बदल, घटना यांचा आढावा घेत गीत, नृत्य आणि प्रहसनांच्या माध्यमातून हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. व्यावसायिक नाटकांमध्ये केदार शिंदे दिग्दर्शित आणि भरत जाधव अभिनीत ‘ढॅण्टॅढॅण’ या नाटकाने ७ पुरस्कार मिळवत सरशी घेतली तर प्रायोगिक नाटकांमध्ये ‘एक बाकी एकाकी’ ने सर्वोत्तम नाटकाचा मान मिळवला. आपल्या लेखणीतून वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, पार्टी, वासांसि जिर्णानी यांसारखी अनेक महत्त्वपूर्ण नाटके मराठीच नव्हे तर जागतिक रंगभूमीला देणारे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राची महावाहिनी असलेल्या झी मराठीचा झी गौरव हा पुरस्कार म्हणजे चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलावंताच्या कार्याची योग्य दखल घेणारा एक मापदंड बनला आहे. यावर्षीपासून चित्रपटांसाठी  झी चित्रगौरव’ आणि नाटकांसाठी झी नाट्यगौरव’ असे दोन पुरस्कार सोहळे होणार असल्यामुळे त्याबद्दल विशेष उत्सुकता होती. चित्रगौरवच्या रंगतदार कार्यक्रमानंतर नाट्यगौरवचा सोहळाही तेवढ्याच देखण्या पद्धतीने पार पडला. यात व्यावसायिक नाटकांमध्ये ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘कळत नकळत’, ‘त्या तिघांची गोष्ट, ‘बेगम मेमरी आठवण गुलाम’ आणि ‘सर्किट हाऊस’ यामध्ये सर्वोत्कृष्ट नाटकासाठीची चुरस रंगली त्यात ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाने हा मान मिळवत बाजी मारली. सर्वोत्कृष्ट  नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा, सहाय्यक अभिनेत्री, दिग्दर्शक आणि विशेष लक्षवेधी नाटक असे सात पुरस्कार मिळवत ढॅण्टॅढॅण’ या नाटकाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. सर्वोत्कृष्ट लेखक मिहीर राजदा, अभिनेता मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत असे महत्त्वाचे पुरस्कार मिळवत गोष्ट तशी गमतीची’  हे नाटक यावर्षीचे सर्वोत्कृष्ट नाटक ठरले.

कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव प्रदान करतानाचा क्षण. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभाताई देशपांडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि कमलाकर सोनटक्के यांच्या उपस्थितीत हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. पटेल म्हणाले की, “मी ज्या काळात नाटके दिग्दर्शित केली त्याकाळातल्या पिढीसाठी महेश एलकुंचवार जेवढे महत्त्वाचे नाटककार होते तेवढेच ते आजच्या पिढीसाठीही आहेत. त्यांच्या लेखणीतून साकार झालेल्या नाटकांचे केवळ मराठीतच नाही तर इतर भारतीय भाषांमध्ये आणि विदेशी भाषांमध्येही प्रयोग झाले त्यामुळे एलकुंचवार हे ख-या अर्थाने जागतिक रंगभूमीचे लेखक आहेत.” हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत मांडताना महेश एलकुंचवार म्हणाले की, “नाट्यलेखन हा कधीच माझा व्यवसाय नव्हता म्हणून नाटक लिहिणं हा माझ्या जगण्याचा अग्रक्रम बनला नाही. मला जगत राहण्यात प्रचंड मजा येते आणि ही मजा अनुभवतच मी नाट्यलेखन करतो. कारण लेखकपणाची झूल अंगावर पांघरली की जगणं बंद होतं मग आपण केवळ अनुभव  ‘शोधत’राहतो त्यात तांत्रिकपणा येतो आणि आपण अनुभव ‘घेणं’ विसरून जातो. अनुभवाचे एकेक झाड शोधण्याच्या नादात आपलं अरण्य हरवून जातं आणि ते अरण्य हरवण्याची मला जास्त भीती वाटते कारण एकदा का आपल्या जगण्यातलं नैसर्गिकपण हरवलं तर आपल्यातील सर्जकाची अखेर होते.” यावेळी बोलतांना त्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्याबरोबरच्या तसेच मुंबईतील टोपीवाला लेनच्या शाळेत रंगणा-या नाटकांच्या आठवणी सांगितल्या.

मराठीतील विशेष नाट्यकृतींचा आढावा घेत हा गौरव सोहळा रंगला. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘महाराष्टाची लोकधारा’, ‘आंधळं दळतंय’ यातील प्रहसनं आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’गीत सादर करून शाहीर साबळे यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. यानंतर ‘संगीत सौभद्र’, ‘वा-यावरची वरात’, ‘वाडा चिरेबंदी’ पासून ते आजच्या ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ पर्यंतच्या नाट्यकृतींना स्पर्श करत ह्या सोहळ्याची उत्तरोत्तर रंगत वाढत गेली. यावर कळस चढवला तो ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने. पं. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजाने आणि अभिनयाने अजरामर झालेल्या या नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ आणि ‘सूरत पियाकीया गाण्यांची जुगलबंदी रंगली ख्यातनाम गायक शंकर महादेवन आणि शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांच्यात.या दोघांच्या गायकीने रसिक भारावून गेले. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक संजय मोने आणि हृषिकेश जोशी यांनी या कार्यक्रमाचे खुमासदार पद्धतीने निवेदन केले. अनेक मान्यवराच्या उपस्थितीत रंगलेला हा  झी नाट्य गौरवचा सोहळा येत्या एप्रिलला सायंकाळी वा. झी मराठीवरून प्रेक्षकांना बघायला मिळेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...