“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”अशी सिंहगर्जना करून ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला हादरवून सोडणारे नेते, भारतीय असंतोषाचे जनक, अभ्यासू पत्रकार, कायदेतज्ज्ञ, थोर समाजसुधारक अशा एक ना अनेक बिरूदावली ज्यांना सन्मानाने आणि आदराने बहाल करण्यात आल्या ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. कोकणात जन्मलेले बाळ गंगाधर टिळक वयाच्या दहाव्या वर्षी पुण्यात आले. या शहराला आपली कर्मभूमी करत त्यांनी आपल्या प्रखर वाणीने आणि कार्याने भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना चेतवली आणि ब्रिटीशांविरूद्धच्या लढ्याला प्रखर बनवत त्यांना ‘सळो की पळो’ करून सोडलं. ख-या अर्थाने जनसामान्यांचा जहाल नेता असलेल्या लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित “लोकमान्य – एक युगपुरूष”हा चित्रपट येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या संगीत प्रकाशनाचा रंगतदार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. चित्रपटाची खास झलक, त्यातील प्रेरणादायक गाणी आणि पोवाड्यांच्या सुरावटीने भारावून गेलेल्या वातावरणात सुप्रसिद्ध निर्माते-अभिनते-दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर आणि लोकप्रिय गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे संगीतकार अजित-समिर, दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेते सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, निर्मात्या नीना राऊत, एस्सेल व्हिजनचे संस्थापक नितीन केणी, गायक, गीतकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याला आपल्या प्रखर वाणीने आणि कर्तृत्वाने क्रांतीचं स्वरूप देणा-या लोकमान्यांच्या आयुष्यावरचा हा पहिलाच चित्रपट. प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यात लोकमान्यांची मुख्य भूमिका साकारत आहेत. याप्रसंगी या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले की, “लोकमान्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर जिथे जिथे आपण उभे असू तिथून देशप्रेमाचीच स्पंदने आपल्याला जाणवतात आणि ती जाणवलीच पाहिजेत. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या महान युगपुरूषाची भूमिका साकारण्याचे भाग्य मला मिळाले हे मी त्यांचेच आशीर्वाद मानतो.” चित्रपटात सुबोध भावेंचा लुक हा लोकमान्यांशी हुबेहुब मिळतोय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक रसिक प्रेक्षकांकडून मिळत आहे. याबद्दल सुबोधला विचारले असता ते म्हणाले की,“एखाद्या दगडाला शेंदूर लावल्यानंतर त्याला देवपण लाभतं. त्या शेंदुरामागे लोकांची श्रद्धा आणि विश्वास असतो. मी स्वतःला असाच एक दगड मानतो ज्याला अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने शेंदूर लावण्याचं काम रंगभूषाकार विक्रम गायकवाड , दिग्दर्शक ओम राऊत आणि संपूर्ण टीमने केलंय. माझ्या या भूमिकेचं, लोकमान्यांसारखं दिसण्याचं श्रेय त्यांचंच आहे. त्यांच्यामुळेच मी लोकमान्य साकारू शकलो.” असंही प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केलं.
“लोकमान्य -एक युगपुरूष”या चित्रपटाची कथा जेवढी टिळकांच्या आयुष्याची आहे तेवढीच ती त्यांच्या विचारांची आहे. त्यांचे विचार हाच या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. हा केवळ लोकमान्यांच्या आयुष्याचा पट नसून तो त्यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी विचारांचा पट आहे” असं मत निर्मात्या नीना राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.
“लोकमान्यांचे विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे याच विचारातून हा चित्रपट बनवल्याची भावना दिग्दर्शक ओम् राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. “लोकमान्यांची वैचारिक जडण-घडण, त्यांचा राजकीय-सामाजिक जीवन प्रवास, त्यांचं शैक्षणिक धोरण, ब्रिटीशांविरूद्ध पुकारलेला स्वराज्यासाठीचा लढा, असहकार आंदोलन, चाफेकर बंधूंची शौर्यगाथा या आणि अशा किती तरी ऐतिहासिक घटनांचा पट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. शाळेतील पाठ्यपुस्तके आणि इतिहासातील धडे यापुरतंच लोकमान्यांचं कार्य मर्यादित न राहता त्यांचे देशभक्तीची जाज्वल्य भावना प्रेक्षकांपर्यंत विशेषतः तरूणांपर्यंत त्यांना आवडेल अशा माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न आम्ही लोकमान्य मधून केलाय” असेही ओम् राऊत यांनी सांगितले. हाच धागा पकडत अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी “हे विचार ज्या पिढीपर्यंत पोचवायचे आहेत त्या पिढीचं प्रतिनिधीत्व करणा-या तरुणाची भूमिका मी या चित्रपटात साकारतोय. लोकमान्यांच्या विचारांनी आणि कार्याने भारावून गेलेला आजच्या काळातील तरूण यात प्रेक्षकांना बघायला मिळेल” असं मनोगत चिन्मयने व्यक्त केलं.
“चित्रपटाच्या ट्रेलरने आणि त्यातील गाण्याने आपण खूप भारावून गेलो असून ओमने हे शिवधनुष्य पेलल्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन करेन. आपल्या पहिल्याच चित्रपटातून लोकमान्यांसारखा ‘लार्जर दॅन लाईफ’ विषय निवडण्याचं काम त्याने केलंय आणि त्यात त्याला भरभरून यश मिळेल” अशा शुभेच्छा अभिनेते सचिन पिळगावकर यांनी याप्रसंगी दिग्दर्शक ओम राऊत आणि टीमला दिल्या. तर या चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आपण लोकमान्यांशी निगडीत एका महत्त्वपूर्ण प्रोजेक्टचा भाग झालो हे मी माझं भाग्य समजतो अशी भावना गायक शंकर महादेवन यांनी व्यक्त केली.
या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती श्रीरंग गोडबोले, गुरू ठाकूर, अजित परब, गणेश चंदनशिवे, उषा बिजुर यांनी शब्दबद्ध केली आहेत तर शंकर महादेवन, नारायण परशुराम आणि नंदेश उमप यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. सुबोधला रंगभूषेतून लोकमान्यांच्या रुपात उतरवण्याचं काम प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी केलं आहे तर वेशभूषा महेश शेरला यांची आहे. कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे तर संकलन आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांचे आहे. चित्रपटाची कथा-पटकथा ओम् राऊत आणि कौस्तुभ सावरकर यांची आहे.
यावर्षी ‘टाइमपास’,‘फॅंड्री, ‘लय भारी, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ असे एकाहून एक सरस चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत