आजच्या पिढीचा वाढत जाणारा टेक्नोसॅव्हीपणा आणि त्यामुळे कमी होत जाणारे संवाद , नात्यांमध्ये वाढत जाणारा दुरावा यावर भाष्य करणारा बंध नायलॉनचे हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हया सिनेमाने नवीन वर्षाची भेट म्हणून पहिल्यांदाच महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांना एकत्र रसिकांसमोर आणलं आहे. खऱ्या आयुष्यातली ही जोडी पहिल्यांदाच ऑन स्क्रीन एकत्र काम करणार आहे. नव्या वर्षाचा आनंद व्दिगुणित व्हावा म्हणून की काय या सिनेमात दोघांचाही डबल रोल आहे. या अगोदरही मेधा यांनी महेश मांजरेकर यांच्यासोबत अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. पण त्यात महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेत असायचे तर मेधा हया कलाकाराच्या भूमिकेत असायच्या. हा पहिलाच चित्रपट आहे कि ज्यात महेश आणि मेधा ऑन स्क्रीन असतील.
जतिन वागळे दिग्दर्शित या सिनेमात मांजरेकर दाम्पत्याने दोन टोकाच्या भूमिका वठवल्या आहेत. ग्रामीण आणि मॉडर्न अशी दोन परस्परविरोधी दाम्पत्य रंगवताना ती छोट्या छोट्या गोष्टीतून एकमेकांपासून किती वेगळी होतील याची काळजी घेतली आहे. ऑफ स्क्रीन एकत्र दिसणारी ही जोडी ऑन स्क्रीन कशी दिसेल याची उत्सुकता सगळयांनाच आहे. बंध नायलॉनचे या सिनेमाची गोष्ट तुमच्या आमच्या घरातलीच आहे.
दोन पिढ्यांमधील भावनिक संघर्ष किती टोकाला जाऊ शकतो आणि त्यात टेक्नोलॉजी किती महत्वाची भूमिका बजावू शकते. याचं नाजूक पण मार्मिक आणि धमाल असं चित्रण या सिनेमात पाहायला मिळेल. महेश आणि मेधा मांजरेकर यांच्यासोबत सुबोध भावे, श्रुती मराठे, संजय नार्वेकर, सुनील बर्वे यांसारखे दिग्गज कलाकार या सिनेमाची ताकद आहे. प्रांजल परब ही बालकलाकारही या सिनेमात एक महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुनील चंद्रिका नायर यांनी झिरो हिट्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली असून २९ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.