पुणे, ता: 29 (प्रतिनिधी) पुण्यात महिला सार्वजनिक
स्वच्छतागृहाचा प्रश्न अजूनही सुटला नाही, वारंवार प्रयत्न
करूनही प्रशासन दरबारी याची कोणतीच दखल घेतली जात
नाही. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने महिलांची
कुचंबणा होत आहे, तसेच शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न
देखील गंभीर बनत चालला आहे. महिलांवर हल्ला करून
मंगळसूत्र चोर्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटना घडत
असल्याने महिलांसाठी शहर असुरक्षित बनत चालले आहेत.
शिक्षणासाठी परगावहून आलेल्या मुलींचे प्रश्न वेगळेच आहेत.
त्यामुळे महिलांच्या प्रश्नांची समस्या सोडवण्यासाठी सक्षम
यंत्रणा निर्माण करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. असे
प्रतिपादन प्रचार पदयात्रे दरम्यान कसबा विधानसभा मतदार
संघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी केले.
गिरीश बापट यांची प्रचार पदयात्रा सकाळी दहा वाजता
प्रभाग क्रमांक 37 मधून सुरु झाली. या प्रभागातील
नागरिकांच्या समस्या जाणून घेताना ते बोलत होते. भारतीय
जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शनिवार वीर मारुती
मंदीरापासून प्रत्येकाच्या व्यक्तीगत भेटीने सुरू झालेली ही
पदयात्रा शनिवारवाडा, शिंदेपार चौक करत नारायण पेठ
भागात आली. यानंतर पत्र्या मारुती चौकात येऊन बापट यांनी
प्रत्येकांना हस्तांदोलन करत समस्या जाणून घेतल्या. पुढे
आप्पा बळवंत चौक करत पदयात्रा केळकर रस्त्यावर आली,
बुधवार पेठ भागातील दगडूशेठला पदयात्रेचे समापन करताना
नागरिकांशी संवाद साधून अनेक प्रश्नांचे उत्तरे त्यांनी दिली.
यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येणपुरे, प्रभाग
क्रमांक 37 चे अध्यक्ष निलेश कदम, हेमंत रासने, बाळासाहेब मोरे, उमेश मोहरे,
अरुण जोशी, कौस्तुभ गाडे, विशाल घरात, रोहीत धावडे, रवी नारळीकर, उमेश
कांड्डरे, संजयमामा देशमुख, छगन बुलाखे, आनंद मालेगांवकर, दिपक पोटे, सुहास
कुलकर्णी, पुष्कर तुळजापूरकर, नामदेव माळवदे, योगिता गोगावले, निर्मला
कदम, विजया हंडे, रीना सपकाळ, रूपाली कदम, शारदा गोखले आदी उपस्थित
होत्या.