सातारा (जि.मा.का.): राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार-2015, राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार-2014 व 2015 आणि विशेष नैपुण्य राष्ट्रीय बाल पुरस्कार 2015 साठी इच्छूक व्यक्ती व संस्थांनी 18 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.व्ही. शिंदे यांनी केले आहे.
शारीरिक व मानिसक दृष्टया अपंगत्व असलेल्या बालकांचा विकास, संरक्षण व कल्याणासाठी कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता उदात्त दृष्टीकोनातून सलग 10 वर्षे वैशिष्ट्यपूर्ण व अद्वितीय असे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केंद्र शासनामार्फत प्रदान केला जातो. या पुरस्काराचे स्वरुप व्यक्तीगत 1 लाख रुपये प्रशस्तीपत्रक असे आहे.
बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. व्यक्तीगत 1 लाख रुपये रोख, मानचिन्ह असा पुरस्कार व राज्यस्तरीय पाच संस्थांसाठी प्रत्येकी 3 लाख रुपये, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य व खेळामध्ये दाखविलेल्या विशेष नैपुण्यासाठी या क्षेत्रामध्ये अद्वितीय क्षमता किंवा विशेष कुशलता दाखविलेल्या 4 ते 15 वयोगटातील मुलांना केंद्र शासनामार्फत पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रथम पुरस्कारासाठी 20 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व सुवर्णपदक इतर पुरस्कारांसाठी चांदीचे पदक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि 10 हजार रुपये रोख असा केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येतो.
या पुरस्कारांच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या पुरस्कारांचे प्रस्ताव व्यक्ती व संस्थांनी 5 प्रतीत विहित नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी. स्टॅण्डजवळ, सातारा या पत्त्यावर दि.18 सप्टेंबरपर्यंत सादर करावेत. मुदतीतनंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.