सांसद आदर्श ग्राम योजने अंतर्गत राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावामध्ये महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दोनशे पन्नास महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे) भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जमीन आरोग्य व्यवस्थापन अभियान 2014-15 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 100 महिलांना खासदार अॅड.वंदना चव्हाण यांच्या हस्ते माती परिक्षण कार्डाचे (Soil Health Card) वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी खा.वंदना चव्हाण यांनी ‘महिला सबलीकरण’विषयी मार्गदर्शन केले. तसेच ‘सुदुंबरे गावात तयार होणारे शेती उत्पादन हे ‘सुदुंबरे ब्रँड’ या नावाने ओळखले जावे यासाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे.’ असे त्या म्हणाल्या.
ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र (नारायणगाव,पुणे) चे डॉ.संतोष सहाणे यांनी उपस्थित महिलांना माती परिक्षण कसे करावे, पिकांची निवड कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. कांदा, ऊस (पाचट व्यवस्थापन), गहू, भात, सोयाबीन, बटाटा लागवडीचे तंत्र, तयार झालेले उत्पन्न बाजारात कधी आणावे, बीजोत्पादन करून शेतकर्यांनी फायदा कसा मिळवावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
संजीवनी जोगळेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी सरपंच संगीता भांगे, उपसरपंच गाडे, ग्रामपंचायत सदस्य आशा गाडे, तसेच ‘बुलढाणा सहकारी बँकेचे’ मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे उपस्थित होते.
सुदुंबरे गावामध्ये कृषिविभागाच्या वतीने राबविण्यात येणारा ‘शेतीशाळा’ हा उपक्रमात अवकाळी पाऊस आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे होणारे शेतकर्यांचे नुकसान कसे टाळता येईल त्यासाठी शेतीनियोजन कसे करावे याविषयी माहिती देण्यात आली.
महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, चमचा लिंबू, रांगोळी स्पर्धा, फुलांच्या रांगोळ्या, गाण्यांच्या भेंड्या अशा विविध खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्दपणे सहभाग घेतला.