सातारा (जिमाका) :समाजविघातक गोष्टींना आळा घालण्यासाठी महिलांनी कायदेविषयक जागरुक होणे ही आज काळाची गरज बनली आहे. महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध घालण्यासाठी महिलांनी स्त्री संरक्षण कादयाची माहिती करुन घेणे आवश्यक आहे. स्त्री संरक्षण कायदा हा स्त्रियांचे खरे कवचकुंडल आहे.महिलांविषयक कायदयाची जागरुकता झाल्यास निश्चितपणे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव व दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, सातारा डॉ.अनिता नेवसे यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विधी साक्षरता शिबीराचे आयोजन कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.नेवसे यांच्या हस्ते विद्यार्थीनी कल्याण मंडळाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच “ओळख कादयाची” या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी प्रा.डॉ.यशवंत पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना महिलांविषयक कायदयाचे मार्गदर्शन करताना डॉ.अनिता नेवसे यांनी विविध कायदयांची माहिती देवून दिनांक 02 ऑक्टोबर 2013 पासून महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू केलेल्या ‘मनोधैर्य योजना’ व ‘अर्थसहाय्य योजना’ या संबंधी सखोल माहिती दिली. ऍ़सिड हल्ला, बाल लैंगिक शोषण व महिलांवरील अत्याचाराच्या घटना यांना आळा घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांना कडक शासन होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकारणातर्फे मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य व विधीसहाय्य केले जाते याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सद्य परिस्थितीमध्ये विद्यार्थीनींनी विविध कायदेविषयक माहिती करुन घेणे आवश्यक आहे, त्याचबरोबर विद्यार्थीनींनी आयुष्यामध्ये उच्चपदस्थ होण्याचे ध्येय आपल्या महाविद्यालयीन जीवनातच बाळगावे, त्या दृष्टीने त्यांची वाटचाल असावी, जी चांगली माहिती आपल्याला मिळते त्याची देवाणघेवाणही इतरांमध्ये करावी, विविध कायदयांची माहिती झाल्यास निश्चितपणे सक्षमता आणि निर्भयता लाभेल असे कथन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.डॉ.मनिषा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन कोमल बामरस यांनी केले. या शिबीरास ऍ़ड.संभाजीराव नलावडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अधिक्षक आर.के.तागडे, व महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
महिलांमध्ये कायदेविषयक जागरुकता होणे ही काळाची गरज – डॉ. अनिता नेवसे
Date:

