पुणे : महावितरणच्या मंचर विभागातील 5 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 242 अभियंते व कर्मचार्यांनी एकाच दिवशी विविध प्रकारचे 638 कामे पूर्णत्वास नेली. यात 20 नवीन वीजजोडण्या तर 280 ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे.
महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रमांना गुरुवारी (दि. 26) मंचर विभागातील (कंसात उपविभाग) निरगुडसर (मंचर), लांडेवाडी (घोडेगाव), पिंपळवंडी (नारायणगाव), बुचकेवाडी (जुन्नर) आणि टिकेकरवाडी (आळेफाटा) या ग्रामपंचायतींमध्ये सुरवात झाली. त्यास ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला व या कार्यक्रमाचे स्वागत केले.
या पाच ग्रामपंचायतींमध्ये महावितरणच्या वतीने मागेल त्यांना वीजजोडणीमध्ये 12 घरगुती, 7 कृषीपंप व एक वाणिज्यिक असे एकूण 20 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय वीजदेयकांबाबत तक्रारी दूर करण्यासाठी 45 वीजदेयकांची दुरुस्ती करण्यात आली. 121 सदोष व नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. ज्या मीटरचे रिंडींग घेतले जात नव्हते अशा 101 मीटरचे रिंडींग घेणे सुरु करण्यात आले. तसेच 71 वीजमीटरची तपासणी करण्यात आली. वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे आदी प्रकारचे एकूण 280 कामे पूर्ण करण्यात आली.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. प्रकाश खांडेकर यांनी ग्रामपंचायतींमध्ये जाऊन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये सहभाग घेतला. पाचही ग्रामपंचायतींमध्ये संबंधीत उपविभागातील सुमारे 40 ते 45 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री कार्यक्रमासाठी दिवसभर कार्यरत होते. या पाचही ग्रामपंचायतींमधील वीजयंत्रणा, वीजदेयक आदींबाबतच्या तक्रारी एकाच दिवशी व गावातच निकाली निघाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा आनंद दिसून आला व या कार्यक्रमाला त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी सहकार्य करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत होते. या त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मठपती, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री रमेश कावळे (आळेफाटा), अविनाश चौगुले (घोडेगाव), संतोष तळपे (मंचर), विवेक सुर्यवंशी (नारायणगाव), जयंत गेटमे (जुन्नर) आदींसह 25 अभियंते, 206 जनमित्र व 9 लेखा लिपीकांनी सहभाग घेतला.
येत्या गुरुवारी 5 ग्रामपंचायतींमध्ये ‘त्रिसुत्री’ – येत्या गुरुवारी, दि. 3 डिसेंबरला मंचर विभागातील (कंसात उपविभाग) खडकवाडी (मंचर), कुरवंडी (घोडेगाव), मांजरवाडी (नारायणगाव), खानगाव (जुन्नर) आणि बल्लाळवाडी (आळेफाटा) या ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीमधील वीजग्राहकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.


