महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युुकेशन सोसायटीच्या वतीने ‘वस्त्रदान महाअभियाना’चे आयोजन
पुणे :
पुण्याचे नाव सामाजिक औदर्याच्या बाबतीत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये जाण्याचा उद्देश मनात ठेवून ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी ‘वस्त्रदान महाअभियाना’चे आयोजन केले आहे.
पी. ए. इनामदार (महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष) आणि ऋषी आचार्य (‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट ’(VEDA) महाविद्यालयाचे प्राचार्य ) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
परिधान करण्यायोग्य कपड्यांचे दान या अभियानांर्गत पुणेकरांकडून स्वीकारले जाणार आहे. ही मोहीम 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2015 या काळात होणार असून, जमा कपड्यांचे लाभार्थींना वितरण दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2015 या कालावधीत होणार आहे.
‘देण्याचा आनंद अनुभवा’ अशी या उपक्रमाची टॅगलाईन आहे. त्यासाठी 020-64013441 / 64013444 या हेल्पलाईनवर किंवा www.giveforpune.com या संकेतस्थळावर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘गुडविल इंडिया’ आणि शहरातील अनेक सामाजिक संस्था या अभियानात सहभागी झाल्या आहेत.
3 लाख कपडे जमा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. याआधीचे गिनीज रेकॉर्ड हे संयुक्त अरब अमिरातीच्या नावावर असून त्यात 1,53,240 कपडे जमा करण्यात आले होते.
हे कपडे समाजातून गोळा करण्यासाठी सोसायट्या आणि कॉलनीज्मधून आवाहन करण्यात येत आहे. पुणे परीसरात 13 ठिकाणी वितरणाची देखिल व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यात सासवड, आळंदी, चाकण, वारजे, शिवणे, धायरी, आणि पिंपरी चिंचवड मधील चार ठिकाणांचा समावेश आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक परिवारामध्ये 29 शैक्षणिक संस्था असून, 27,000 विद्यार्थी त्यात शिक्षण घेत आहेत. त्यांचेही सहकार्य या अभियानात मिळणार आहे.
‘गुडविल इंडिया’ ही गेल्या साडेतीन वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. यापूर्वीही त्यांनी गरजूंना कपडे मिळवून देण्याचे काम केेले आहे.