पुणे:
शहरात डेंग्युला अटकाव घालण्यासाठी पालिका करीत असलेल्या उपाययोजनांतील सर्वेक्षणात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या आणि “बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे डॉक्टर्स मदत करीत आहेत, अशी माहिती “महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ.ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
पुण्यातील औंध, बिबवेवाडी, भवानी पेठ, वारजे, घोले रोड, हडपसर, कृष्णानगर (हडपसर), नगर रोड, धनकवडी, मार्केटयार्ड, कोंढवा, शिवाजीनगर, गुलटेकडी, ढोले-पाटील रोड या भागामध्ये पालिकेची डेंग्यु अटकाव मोहिम सुरू आहे . पालिकेच्या या मोहिमेतील सर्वेक्षण कार्यात “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे 42 डॉक्टर्स व कर्मचारी सहभागी आहेत. आत्तापर्यंत “डायल 108′ सेवेच्या रूग्णवाहिकेद्वारे डेंग्यू लक्षणाच्या सात गंभीर रूग्णांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
“26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. 108 डायल वातानुकुलित विनामूल्य सेवा रूग्णवाहिकांमध्ये प्राण वाचविण्यासाठी व्हेंटीलेटरसहित सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साधने आहेत. या सेवेचे मुख्य संचालन केंद्र व “रिस्पॉन्स सेंटर’ औंध उरो रुग्णालय (पुणे) येथे आहे, असे “बी.व्ही.जी. इंडिया’चे अध्यक्ष एच.आर. गायकवाड यांनी सांगितले.