‘नरेंद्र मोदी यांच्याविरोधात माझा राग नाही. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी , त्यांना आम्ही संपूर्ण देश दिला. पण आता आमचा महाराष्ट्र आम्हाला देण्याची दिलदारी त्यांच्यात नाही. मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही साथ दिली. मात्र साथ दिल्यानंतरही ते जर अशी लाथ मारणार असतील, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद कोणाच्या पाठीशी आहेत, ते महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.चहावाला पंतप्रधान झाला याचा आनंद आहे गुजरात दंगलीनंतर सारा देश मोदींच्या विरोधात गेला तेव्हा अडवाणी यांनी मुंबईत येवून बाळासाहेबांकडे विचारणा केली होती ‘ ये मोदी का क्या करे ?तेव्हा सेनेने त्यांची पाठराखण केली , नर्मदा सरोवर प्रकरणी एकट्या पडलेल्या मोदीला सेनेनेच साथ दिली होती . कोण होते मोदी ? असा सवाल करीत ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला उद्धव म्हणाले, शिवाजी महाराजांना संपवायला कुतुबशाह, निजामशाह, आदिलशाह आले. परंतु त्यांचे काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहे. (गर्दीतून अमित शहा यांचे नाव पुकारण्यात आले) उगाचच घाई करू नका. माझ्या तोंडून नको ते नाव येईल असे म्हणत त्यांनी अमित शहा यांचे नाव टाळले. मोदी लाट होती तर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भाजप का हरली?असा सवाल हि त्यांनी केला .
जागा ,जागा , काय करता , काय मागता? विधानसभेच्या सर्व २८८ जागा देतो आणि त्याबरोबर लोकसभेच्या ४८ जागाही आम्ही तुम्हाला देऊन टाकतो, पण … मात्र त्याअगोदर पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यातील जागा घेऊन या. कर्नाटकमध्ये असलेला महाराष्ट्राचा भूभाग परत आणा. जागेची काय किंमत असते हे काश्मिरी पंडितांना विचारून पाहा.आणि सीमाभागातील मराठी बांधवांना जाऊन विचारा आणि मग निवडणुकीतील जागा मागा असेही ते म्हणाले .
(उद्धव ठाकरे यांच्या भाषणात अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार ‘या सिनेमाच्या संवादाचा बराच प्रभाव असावा असे जाणवले , ‘ जाओ पहले उस आदमी का साईन लावो … फिर मेरे भाई , तुम जिस कागज पार कहते हो उस पे साईन करुंगा … यावर हा भाषणातला मुद्दा होता तर , मेरे पास बंगला है , मोटार ही … क्या है तुम्हारे पास ? …मेरे पास शिव छत्रपती जीन्का आशीर्वाद है … ही स्टाईल त्यांच्या भाषणात जाणवली )
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तुटल्यानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी त्यांचा पहिलाच वार अपेक्षेनुसार भाजपवर केला. ‘मोगलांच्या मस्तवाल हत्तीशी दोन हात करणारे मावळे जसे शिवरायांकडे होते, तसेच महाराष्ट्रावर चालून येणाऱ्या मस्तवाल हत्तींच्या सोंडा कापून त्यांना परत पाठविण्यास शिवसेना समर्थ आहे’ या शब्दांत भाजपला लक्ष्य करीत त्यांच्याविरोधात उद्धव यांनी रणशिंग फुंकले. ‘शिवसेना-भाजप युती तोडण्यास मी कारणीभूत नसलो तरीही मला महाराष्ट्राने माफ करावे. महाराष्ट्राला दिलेल्या वचनाला शिवसेना जागणार असून, लाट काय असते ते शिवसेना दाखवून देईल. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणून दाखवेन’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ महालक्ष्मी रेसकोर्स येथे शनिवारी वाढवण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या वाटाघाटींचा लेखाजोखा सर्वांपुढे मांडला. ‘युती तोडण्याचे भाजपने बहुदा आधीच ठरवले होते. युती टिकविण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला; मात्र अधिकच्या ३५ जागा मागितल्या जात असतील तर त्या देणे कुणालाही अशक्यच ठरले असते. मी माझ्या आणि त्यांच्या वाट्याच्या १९ जागा सोडल्या होत्या. मात्र त्याउपर जागा सोडणे शक्य नव्हते’, असे उद्धव म्हणाले. ‘शिवसेनेने घाम गाळून, प्रसंगी रक्त आटवून ज्या जागा आजवर मिळवल्या, टिकवल्या त्या सहजासहजी द्यायला आम्ही काय जागांचे गोडाऊन काढले आहे का? भूमिपुत्रांच्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. भाजपने हिंदुत्वाची युती तोडली आहे, त्यांना हिंदू कधीही माफ करणार नाही’, अशी तोफही त्यांनी डागली.
‘बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी रामदास आठवले यांना माझे जाहीर आवाहन आहे. सगळेच मित्रपक्ष पळून गेले आहेत. माझ्याकडे आत्ता आहे तो विश्वास’, असे म्हणत रामदास आठवले यांना उपमुख्यमंत्रिपदाची जाहीर ऑफर उद्धव यांनी पुन्हा दिली.
मुंडे-महाजन यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध होते आणि ते पुढेही राहतील. पंकजाला मी बहीण मानले असून एक भाऊ म्हणून मी तिच्याविरोधात कसा लढणार? त्यामुळे पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असे उद्धव यांनी यावेळी जाहीर केले.( मात्र या संपूर्ण भाषणात त्यांनी आपला भाऊ राज ठाकरे यांचा नामोल्लेख अगर साधा स्पर्श हि म न से ला केला नाही)
विरोधकांचा समाचार घेताना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मला अनुभव नसल्याचे सांगताहेत. मग तुम्हाला अनुभव असताना फायली का नाहीत हलल्या, असा टोला उद्धव यांनी लगावला. भ्रष्टाचार करण्याचा वा कामच न करण्याचा अनुभव मला नसेल तर हे चांगलेच आहे. मंगळावर यान गेल्यानंतर तिथले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याकडच्या शरद पवारांनी तिथेही कदाचित आधीच जमिनी घेऊन ठेवल्या असतील, असा चिमटा त्यांनी काढला.
युती तुटल्याचे सांगण्याची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर देण्यात आली. त्यावर मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा खडसे यांनी प्रयत्न केला. मात्र आम्ही मांजर नसून वाघ आहोत. २५ वर्षे मैत्री केली असली तरी या वाघाचे मांजर झालेले नाही. तुम्ही जी घंटा गळ्यात बांधलीत, ती अख्ख्या महाराष्ट्रात नेऊन हिंदूंचा काय घंटानाद असतो, ते तुम्हाला दाखवून देऊ, असे उद्धव म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ कॅसेट काढण्यात आली असून त्यात शिवसेनेला विजयी करण्याचा संदेश देण्यात आला आहे. ही कॅसेट भाषणाच्या शेवटी सर्वांना देत उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना वचनबद्ध केले.
मुख्यमंत्रीपदासाठी मी युती तोडली असे आता कोणी म्हणेल, पण मग तुम्ही ज्या जागा वाढवून मागत होतात, त्या मंत्रालयात सागरगोट्या की लगोऱ्या खेळण्यासाठी अशा शब्दांत त्यांनी भाजपचे नाव न घेता उद्धव यांनी तोफ डागली. मी उगाच खुर्चीची स्वप्ने पाहत नाही, मात्र मी जबादारीपासून पळतही नाही. शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील मायबाप जनतेच्या मदतीने मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आणून दाखवेनच. पूर्ण बहुमताने सत्ता आली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस म्हणेल त्या बालेकिल्ल्यात मी उभा राहीन आणि निवडून येईन, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले शिवसेनेने हिंदुत्वाची कास कधीही सोडली नाही. मुंबईत दंगली पेटल्यानंतर आम्ही गुजराती, मारवाडी, जैन वा मराठी-अमराठी असा वाद केला नाही, प्रत्येकाला आम्ही मदत केली. शिवसेना रस्त्यावर मदतीसाठी उतरली, तेव्हा बाकीचे कुठे गेले होते, असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकणार नाही …
गेली २५ वर्षे राज्याच्या राजकारणात नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या व आता विधानसभेच्या तोंडावर वेगळा घरोबा करणाऱ्या भारतीय जनता पक्षावर शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही शनिवारी चौफेर टीकेची झोड उठवली. ‘महाराष्ट्र कधीच दिल्लीसमोर झुकला नाही, त्यामुळे भाजपने आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नये,’ असा खणखणीत इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.
युतीतून स्वतंत्र झाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रचारसभा शनिवारी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मात्र तत्पूर्वी शिवसेनेच्या इतर नेत्यांनी आपल्या भाषणात भाजपची ‘कमळाबाई’ अशी निर्भर्त्सना करत त्यांच्या फुटीच्या भूमिकेवर कठोर टीका केली. ‘आमचे आजपर्यंत मिशन १५० होते, आता २५० असेल. जिथे भगवा आहे तेथे छत्रपती आहेत. महाराजांचा महाराष्ट्र इकडे तिकडे जाणार नाही. आम्हाला दिल्लीची मिजास दाखवू नका, महाराष्ट्राने औरंगजेबासारख्या दिल्लीश्वराला पाणी पाजले आहे,’ असे खासदार संजय राऊत यांनी भाजपला ठणकावून सांगितले. ‘आजपर्यंत आम्ही हमाली केली, यापुढे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकरणार नाही,’ असा इशाराही राऊत यांनी दिला.
२५ वर्षांच्या संसारातून आता कमळाबाई निघून गेली आहे. पण सौभाग्य आमच्याकडे आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरच्या लढाईत विजय शिवसेनेचाच होईल, असे म्हणत राऊत यांनी कमळाबाईबरोबर शिवसेनेची अडीच दशकांची युती नव्हती, ते लफडं होतं, या शब्दात भाजपवर हल्ला चढवला. कर्माने मरणाऱ्यांना धर्माने मारण्याची गरज नाही. यापुढे महाराष्ट्राचे राज्य मातोश्रीवरून चालेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीश्वरास मुजरा करणाऱ्यांतला महाराष्ट्र नाही. दिल्लीने अनेकदा महाराष्ट्र वार केले. या वेळी आमच्याकडे बाळासाहेबांच्या पुण्याईचे बख्तर आहे. आगामी निवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मतरुपी वाघनखाने कोथळा बाहेर काढतील, असा आशावाद शिवसेनेचे उपनेते व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांचेही या वेळी भाषण झाले.
महाराष्ट्र आमचाच …. उद्धव ठाकरे
Date: