- ‘मेक इन इंडिया सप्ताह’
- मेक इन इंडियाच्या यशस्वी आयोजनासाठी गडकरींकडून राज्य सरकारचे कौतुक
- टोलसाठी ई स्टिकरचा वापर, बँकांमधून मिळणार ई-स्टिकर
- टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाय
- महानगरांच्या सीमेवर 350 वाहनतळे उभारणार
- देशभरातील दोन हजार बंदरांचा विकास करणार
बांद्रा-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात उभारण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया सेंटर’मधील माध्यम कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.गडकरी बोलत होते.
श्री.गडकरी म्हणाले, देशभरात यापुढे वाहनांवर ई-स्टिकर देण्यात येतील. वेगवेगळ्या बँकेच्या मार्फत ई-स्टिकर वाहन चालकांना खरेदी करता येतील. हे ई स्टिकर पुन्हा रिचार्ज सुद्धा करता येणार आहेत. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी असणाऱ्या टोल नाक्यांवरुन आपल्या वेगात वाहनांना विना अडथळा प्रवास करता येईल. महाराष्ट्रासह देशभरातील वाहनांसाठी ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल. ई-स्टिकर संदर्भात बँकांसोबत बोलणी झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आम्ही रस्ते, रेल्वे वाहतूक आणि जलवाहतूक यासंदर्भातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करणार असून देशात ३०० रिंग रोड तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. सोबतच देशातील जलवाहतुकीचा दर वाढविण्याचा प्रयत्न नजीकच्या काळात केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सागरी वाहतुकीसोबतच गंगा नदीसह अन्य ठिकाणीही जलवाहतुकीला प्राधान्य देणार आहे. महाराष्ट्रातील बंदरांचे बळकटीकरण आणि जलवाहतुकीला चालना देण्याचे काम नजीकच्या काळात गतीने होणार आहे. देशातील 2 हजार बंदरांचा विकास करण्यात येईल,असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.
महानगरांमधील वाहनांचे प्रदूषण लक्षात घेता देशभरातील बहुतेक महानगरांच्या सीमेवर 350 वाहनतळे उभारण्यात येणार आहेत. याठिकाणी पेट्रोलपंपापासून ते कोल्ड स्टोरेजपर्यंतच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध राहतील. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास आणि कृषीवर आधारित आर्थिक दरवाढीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच मुंबईतील या पहिल्या ‘मेक इन इंडिया सप्ताहा’मध्ये त्यांच्या संकल्पनेचा विस्तार ठिकठिकाणी दिसून येतो. भारतीय तरुणांच्या नवनवीन प्रयोगांना या सप्ताहामध्ये स्थान मिळाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकारने या आयोजनात निभावलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.