मुंबई : महाराष्ट्रात चित्रपट किंवा लघुचित्रपट निर्मिती करु इच्छिणाऱ्यांना एका दिवसात परवानगी मिळणार आहे. त्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
बॉम्बे एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय टुरिझम मार्ट’ च्या वतीने ‘शूट इन महाराष्ट्रा’ चर्चासत्रात श्री. तावडे बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकेश भट, रमेश सिप्पी, यशराज फिल्मचे आशिष सिंग, श्रीमती कांचन अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकत्रितरीत्या मिळाव्या, यासाठी चित्रनगरी महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात येणार आहे. चित्रपटनगरीला चित्रपट निर्मिती केंद्रासोबतच पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. चित्रपटनगरी आणि बॉलिवूड म्युझियम हे पी.पी.पी. तत्वावर एकत्रितरित्या विकसित करण्यात येणार आहेत. याबाबतचा विकास आराखडा ही तयार करण्यात आला आहे. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात जगाची राजधानी बनण्याचे सामर्थ्य मुंबईमध्ये असून निर्मात्यांनी चित्रपट निर्मितीसाठी महाराष्ट्रालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी उत्कृष्ट ठिकाणाची यादी लवकरच तयार करण्यात येणार असून त्याबद्दलची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच महाराष्ट्र शासन व टोरांटो फिल्म कमिशन यांच्यादरम्यान स्वाक्षरी करार (एम.ओ.यु.) करण्यात येणार असल्याचे श्रीमती नायर- सिंह यांनी सांगितले.
मुकेश भट, रमेश सिप्पी, आशिष सिंग, श्रीमती कांचन अधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले.