आळंदी येथे ज्ञानेश्वरी लेखनाच्या 725 व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या एक लाखांपेक्षा अधिक वाचक पारायण सोहळ्याच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, भाजपचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, नागपूरचे रामरावजी महाराज ढोक, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष अजितराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून व्यक्तिबरोबरच सामष्टीचा विचार मांडला आहे. निसर्गाच्या संवर्धनाला महत्व दिले आहे. आपण प्रगतीच्या नावाखाली निसर्गावर अन्याय करीत आहोत. आपल्या राज्यातील नद्यांचे प्रदुषण उद्योगाशिवाय शहरीकरणामुळे अधिक होत आहे. महानगरांमधील सांडपाणी आणि इतर दुषित घटकांमुळे नद्यांचे पाणी खूप प्रदूषित होत आहे. हे थांबविण्याबरोबरच या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा मानस आहे. त्यामुळे इंद्रायणीबरोबरच राज्यांतील नद्यांच्या दुषित पाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या कामात केंद्र सरकारची मदतही घेण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या संकल्पनेला मान्यता दिली आहे. हे काम एका वर्षात पूर्ण होणार नाही. परंतु येत्या तीन चार वर्षात ते पूर्ण केले जाईल, असा मानसही त्यांनी व्यक्त केला.
वारकरी संप्रदायातील भक्ती ही सज्जनशक्ती आहे. या शक्तीवर गेल्या सातशे वर्षात एकही डाग लागला नाही. ज्ञानेश्वरी हे महाराष्ट्राचे वैभव आहे. वारकऱ्यांनी गेली आठशे वर्षे वात्सल्याची भक्तीभावना जीवंत ठेवली आहे. कोणत्याही भौतिक प्रगतीत सात्विकता नसेल तर ते चिरकाल टिकत नाही. जागतिकीकरणाची आपल्याकडे आलेली संकल्पना 1991 नंतरची असली तरी आणि संवाद माध्यमामुळे विश्वाला खेड्याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे सांगितले जात असले तरी ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षापूर्वी वैश्विक कुटुंबाची संकल्पना मांडली होती. जागतिक संघर्ष संपवून समाजाची जडणघडण व्हावी असा संदेश ज्ञानेश्वरांनी दिला होता, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ज्ञानेश्वरीतील वाङमय साहित्याचा ठेवा सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करील, असेही ते म्हणाले.
आळंदी शहराच्या विकास आराखड्यात आवश्यकता असल्यास दुरूस्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार श्री. दानवे यांचेही भाषण झाले. तत्पूर्वी ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते झाले. ज्ञानेश्वरी ग्रंथाचेही पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रकाश महाराज बोधले यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.