पुणे-पुण्याचे आताचे मावळते महापौर दत्ता धनकवडे आणि त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक विशाल तांबे यांच्यातील राजकीय खेचाखेची अखेर चव्हाट्यावर आली असून यातून संताप – नैराश्य आलेल्या विशाल तांबे यांनी आज नगरसेवक पदाचाच राजीनामा दिला . दक्षिण पुण्याला राष्ट्रवादीने महापालिकेतील अनेक महत्वाची पदे देवूनही राष्ट्रवादीच्या तथकथित नेत्यांमधील रस्सीखेच थांबलेली नाही . महापौर , सभागृह नेता , स्थायी समिती अध्यक्ष अशी महापालिकेतील पदे , आणि युवक अध्यक्ष असे पक्षातील पद राष्ट्रवादीने दक्षिण पुण्याच्या वाटेला टाकून हि हा वाद पराकोटीला गेला आहे . चैतन्य नगरच्या भूखंडावरून हा वाद उफाळला आहे .
न्यायालयीन लढाई जिंकून मिळविलेल्या भूखंडावर उद्यान उभारण्यासाठी दिलेला प्रस्ताव महापौर आणि सभागृहनेता जाणीवपूर्वक पुढे ढकलत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनकवडी येथील नगरसेवक विशाल तांबे यांनी आज नगरसेवकपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठविला . केवळ बांधकाम व्यावसायीकाच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात असून धनकवडी आणि चैतन्यनगर येथील नागरिकांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून याठिकाणी उद्यान उभारण्यासाठी प्रयत्न करेन, असेही तांबे यांनी राजीनाम्यामध्ये नमूद केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र हा बांधकाम व्यावसायिक कोण हे मात्र समजू शकलेले नाही
या राजीनाम्याची प्रत पक्षाचे विधीमंडळातील नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाच्या शहरअध्यक्षा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनाही पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. माहिती अशी की धनकवडी येथील चैतन्यनगर येथील सुमारे एक एकरचा भूखंड उदयानासाठी आरक्षित करण्यासाठीची प्रक्रिया येत्या ९० दिवसांत पूर्ण करा, असा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला आहे. त्यामुळे येत्या ११ दिवसांत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास धनकवडीमध्ये उद्यान साकारणार आहेे. परंतू या ठिकाणी इमारत बांधण्यास एक बांधकाम व्यावसायीक प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर स्थानीक नगरसेवक विशाल तांबे यांनी याठिकाणी उद्यान उभारणीस मान्यता देण्यात यावी यासाठीचा प्रस्ताव नोव्हेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर ठेवला आहे. परंतू १९ नोव्हेंबरची सभा ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.
३० नोव्हेंबरला सभेमध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. विशेष म्हणजे ३० तारखेला सकाळी ११ वाजल्यापासून ८ सभांचे कामकाज झाले. नेमके नोव्हेंबर महिन्याची कार्यपत्रिका अंतिम होती. आजच या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास उद्यान निर्मितीचा मार्ग खुला होईल, ही बाब तांबे यांनी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि सभागृहनेते बंडू केमसे यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतू उपमहापौर आबा बागुल यांनी मधेच कोरमचा मुद्दा उपस्थित केला. तांबे यांनी त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर बागुल यांनी कोरमची मागणी मागे घेतली. मात्र, महापौर आणि सभागृहनेत्यांनी कोरम नसल्याने सभा तहकुब केली. यामुळे प्रस्ताव आणखी १७ दिवस पुढे ढकलला गेला आणि नागरिकांचे उद्यानाचे स्वप्न अधिकच अंधुक झाले.
. या जागेवर उद्यान व्हावे यासाठी चैतन्यनगर येथील नागरिकांनी याठिकाणी उद्यानाचे आरक्षण व्हावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. तांबे यांनी यासाठी सातत्याने ८ वर्षे पाठपुरावा केला. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेउन ९० दिवसांत याठिकाणी उद्यानाचे आरक्षण टाकण्याची प्रक्रिया पुर्ण करावी, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. परंतू महापौर धनकवडे आणि सभागृहनेते बंडू केमसे यांनी जाणीवपूर्वक सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव प्रलंबीत राहील यासाठी प्रयत्न करून नागरिकांना उद्यानापासून वंचित ठेवले. केवळ या जागेवर डोळा असलेल्या बांधकाम व्यावसायीकासाठीच हा प्रयत्न करण्यात आला असून मला नगरसेवक पदापेक्षा नागरिकांचे हित महत्वाचे वाटत आहे. त्यामुळे मी नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहाणार असून नागरिकांच्या उद्यानाच्या मागणीसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा लढा सुरूच ठेवणार, असे तांबे यांनी राजीनामा पत्रात नमुद केले आहे.

