.शिवसेना व भाजपच्या युतीवर अखेर आज शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे भाजप व शिवसेना नेत्यांत आज दुपारी 12 वाजता मुंबईत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर भाजप-शिवसेनेची युती अभेद्य असल्याची घोषणा विनोद तावडे व संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या बैठकीला महायुतीतील मित्रपक्षांना न बोलावल्यामुळे ते नाराज झाले आहेत. हवे तर आमच्या जागा घ्या पण युती तोडू नका असे म्हणणाऱ्या मित्रापक्षांच्यावर आता परीक्षेची आहे मात्र योग्य जागा न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा राजू शेट्टी व महादेव जानकर यांनी दिला आहे.
युतीतील सूत्रांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला नवा प्रस्ताव दिला. त्यानुसार शिवसेना 150, भाजप 124 तर उर्वरित चार घटकपक्षांना 14 जागा देण्यावर या दोन्ही पक्षांत एकमत झाले. याबाबतची माहिती सायंकाळी मित्रपक्षांतील नेत्यांना दिली जाणार आहे. त्यांच्याकडून संमती मिळाली की महायुतीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. भाजप-सेनेतील वाद आता संपला असल्याचे दिसत असले तरी महायुतीतील इतर घटकपक्ष नक्कीच नाराज आहेत. चार घटकपक्षांना मिळून केवळ 14 मिळणार आहे.
गेल्या 25 वर्षापासून युती टिकविण्यासाठी शिवसेना- भाजपच्या नेत्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून आज पुन्हा एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेतला. यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई, सुभाष देसाई, तर भाजपकडून ओम माथूर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आदी नेते उपस्थित होते.
खासदार राजू शेठ्ठी यांनी या प्रस्तावावर अधिक बोलण्यास नकार दिला. जो काही प्रस्ताव असेल तो आम्हाला सांगितला जाईल त्यानंतर यावर भाष्य करता येईल. मात्र, आम्ही यांचे भांडण मिटावे यासाठी किमान 18 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यापेक्षा कमी जागा घेणे अशक्य असेल.
खासदार रामदास आठवले यांनी सांगितले की, घटकपक्षांना किमान 20-22 जागा मिळाल्या पाहिजेत. यातील आरपीआयला किमान 8-10 जागा दिल्या तरच महायुतीत राहू अन्यथा वेगळा विचार करण्यास मागे-पुढे पाहणार नाही असा इशारा आठवले यांनी दिला.