पालिकेवर ताण न येता नवे प्रकल्प आणणार
पुणे –
‘शहराच्या विकासासाठी सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत मार्गी लावणे. महापालिकेवर आर्थिक ताण येऊ न देता विविध मार्गातून निधी उभारून नवे प्रकल्प आणणे. करवाढ न करता पुणेकरांना दिलासा देतानाच महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याला माझे प्राधान्य राहील,’असे महापालिकेच्या स्थायी समितीचे नूतन अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सोमवारी स्पष्ट केले.
अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भिमाले यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, महापौर मंजूषा नागपुरे, सभागृह नेते गणेश बीडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे यांसह सर्वांचा आभारी आहे,असे भिमाले म्हणाले. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुणेकरांची गरज लक्षात घेऊन नवनवे प्रकल्प आणले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यासह लगतच्या परिसराच्या विकासाचे ‘व्हिजन’ मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याला गती देण्याचा माझा प्रयत्न राहील. २०१७ ते २०२२ मध्ये महापालिकेवर भाजपची सत्ता असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून पुण्यासाठी अनेक प्रकल्प आले. निधी मिळाला. शहरात ३२ किलोमीटर मेट्रो धावत आहे. मेट्रोचा विस्तार केला जात आहे. समान पाणीपुरवठा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. जायका, विमानतळ विस्तारीकरण,ई बस खरेदी आदी प्रकल्प वेगाने पुढे नेले जात आहेत,असे भिमाले म्हणाले.
‘विविध प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून महापालिकेला १०००-१२०० कोटी रुपये येणे आहे. तातडीने हा निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा केला जाईल. उत्पन्नवाढीसाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जातील. समाविष्ट २३ गावांमधून बांधकाम व विकास शुल्कातूनही पालिकेला निधी मिळेल. करवाढ न करता पुणेकरांना दिलासा देण्याची आमची भूमिका असेल. आगामी अर्थसंकल्पात पुणेकरांना दिलासा देणाऱ्या अनेक चांगल्या कल्पना मांडल्या जातील.असे भिमाले यांनी सांगितले.
‘आगामी काळात महापालिकेवर आर्थिक ताण न येता नवे प्रकल्प आणण्याचे माझे नियोजन आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची आर्थिक मदत, सीएसआर तसेच ‘पीपीपी’ च्या माध्यमातून निधी उभारला जाईल. समाविष्ट गावांबाबत दुजाभाव केला जाणार नाही. त्यांना पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी दिला जाईल वर्षभराचा विचार नव्हे तर पूर्ण पाच वर्षांचा विचार करून आम्ही विकासकामांचे नियोजन करणार आहोत,’असेही भिमाले यांनी नमूद केले.
भिमाले सन 2002 मध्ये सॅलिसबरी पार्क परिसरातून पुणे महानगरपालिकेत पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर सन 2012, 2017 आणि 2026 असे या भागाचे महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत. सन 2017 मध्ये त्यांनी सभागृह नेते म्हणून जबाबदारी पार पडली.

