मसाप चा ‘कृष्ण मुकुंद ‘ पुरस्कार मकरंद साठे यांना प्रदान
मकरंद साठेंच्या लेखनात व्यापक अभिसरणाची संश्लेषणात्मक मांडणी :समर नखाते
महाराष्ट्राचे विचार,चळवळ ,रंगभूमीची परंपरा भारतात आणि भारताबाहेर माहिती होण्याची गरज :मकरंद साठे
पुणे :
‘ इतिहास घडल्यावर त्याची जंत्री करणे वेगळे असते मात्र मराठी नाटकांचा इतिहास लिहिताना तत्कालीन मितींना भिडत वैचारिक ,सांस्कृतिक ,भावनिक असे व्यापक अभिसरण आणि संश्लेषण मकरंद साठे यांनी मांडण्यात यशस्वी झाले आहेत ‘ असे गौरवोद्गार ज्येष्ठ बहु -माध्यम तज्ञ समर नखाते यांनी काढले
ग्रंथालय चळवळीचे प्रणेते कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित ‘कृष्ण -मुकुंद ‘ पुरस्कार वितरण प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते
दहा हजार रुपये ,स्मृतिचिन्ह असलेला हा पुरस्कार समर नखाते ,यांच्या हस्ते आणि डॉ माधवी वैद्य ,प्रकाश पायगुडे ,सुनील महाजन,मोहन गुजराथी यांच्या उपस्थितीत मकरंद साठे यांना प्रदान करण्यात आला . मराठीतील संशोधनात्मक लिखाणाला दिला जाणारा हा पुरस्कार यावर्षी मकरंद साठे लिखित ‘मराठी नाटकांचा इतिहास :(तीस रात्री ) ‘ या ग्रंथाला जाहीर झाला होता
समर नखाते म्हणाले ,’ एखादे घटीत घडून गेल्यावर ,प्रयोग झाल्यावर त्या काळातील संदर्भांसह लिखाण करणे अवघड असते .इतिहास लिहिताना घटनांची जंत्री करणे सोपे असते ,मात्र माहितीचे विश्लेषण करून ज्ञानात रुपांतर करणे अवघड असते . मराठी नाटकांचा इतिहास लिहिताना तत्कालीन मितींना भिडत वैचारिक ,सांस्कृतिक ,भावनिक असे व्यापक अभिसरण आणि संश्लेषण मांडण्यात मकरंद साठे यशस्वी झाले आहेत ‘
माहितीचे ज्ञानात रुपांतर करणे आणि ज्ञानाची कारणमीमांसा करीत संश्लेषणात्मक प्रणाली मांडणे हे सध्याचे आव्हान आहे ‘ असेही नखाते म्हणाले
सत्काराला उत्तर देताना मकरंद साठे म्हणाले ,’नाटकाप्रमाणे लिखाणाला देखील प्रतिसाद मिळणे आवश्यक असते . त्यामुळे पुरस्कार रुपी प्रतिसाद मिळाल्याचा आनंद झाला आहे . जे घडते ते मांडणे हे लेखकाचे काम असते मात्र त्याची कारणमीमांसा करणे हे लेखकाचे काम नसते . तरीही मराठी नाटकांबद्दल तत्कालीन सामाजिक ,राजकीय ,साहित्यिक अंत :प्रवाह असलेले पुस्तक लिहिले कारण अशा लिखाणाची पोकळी मला जाणवली होती . या इतिहासाची समाजालाही आवश्यकता होती . महाराष्ट्रातील महापुरुष आता आता कुठे समजू लागले असताना मराठी नाटकाचा इतिहासाचा उल्लेख मात्र भारतीय नाटकाच्या इतिहासात आणि भारताबाहेर का नाही हा प्रश्न मला पडला होता . महाराष्ट्राचे विचार,चळवळ ,रंगभूमीची परंपरा भारतात आणि भारताबाहेर माहिती होण्याची गरज आहे ‘
कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या कार्याविषयी त्यांच्या कन्या प्रा . नलिनी गुजराथी यांनी माहिती दिली . डॉ कल्याणी दिवेकर यांनी सूत्र संचालन केले . परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले