महाराष्ट्र भूमी ही वारकऱ्यांची, संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत आणि स्वामी समर्थांपासून साईबाबांपर्यंत अशी महान संतांची थोर परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. आजच्या धावपळीच्या युगात या संतांच्या विचारांचा कुठेतरी विसर पडला आहे, म्हणूनच मानवाची मन:शांती हरवत चालली आहे. संतांच्या याच विचाराची आठवण करून देण्यासाठी गायक-संगीतकार-अभिनेता त्यागराज खाडिलकर ‘मला वेड लागले संतांचे’ हे नाटक रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या नाटकात त्यागराज खाडिलकर यांनी ३३ पात्र साकारली आहेत.
‘मोक्ष आर्ट्स’च्या बॅनरखाली वीणा खाडिलकर यांनी या नाटकाची निर्मिती केली असून या नाटकाचे लेखन आणि संगीत त्यागराज खाडिलकर यांचेच आहे. या नाटकाचे नेपथ्य आणि दिग्दर्शन ज्ञानेश्वर मर्गज यांनी केले आहे. अनेक पुरस्कार प्राप्त युवा किर्तनकार वीणा खाडिलकर यांनी या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. वारकरी संप्रदाय आणि नारदीय संप्रदायाच्या वारसा लाभलेल्या वीणा खाडिलकर यांना तीन पिढ्यांची किर्तनाची परंपराही लाभली आहे. ‘मला वेड लागले संतांचे’ या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे आणि विठ्ठल कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
‘
मला वेड लागले संतांचे’ हे नाटक म्हणजे संतविचारांचं भांडार आहे. महाराष्ट्रावर थोर संतांच्या विचारांचा पगडा आहे. पण आज धकाधकीच्या जीवनात, इंटरनेटच्या युगात संताचे साहित्या वाचायला कोणाला वेळच मिळत नाही. त्यामुळे तरुण पिढी या अध्यात्मिक साहित्यापासून दूर गेली आहे. त्यांना संतांच्या विचारांचाही विसर पडला आहे. त्यांची आत्मतत्व, जगण्याची दिशा आणि मन:शांती हरवली आहे. आजच्या युगात मन:शांती लाभाण्यासाठी संतविचारांची खरी गरज समाजाला आहे. याचं विचारातून ‘मला वेड लागले संतांचे’ ही संकल्पना निर्माण झाली.
किर्तन प्रवाचनाद्वारे संतांचे विचार मांडण्यापेक्षा नाट्यरूपात ते समोर आले, तर आजच्या पिढीला पटकन पटतील आणि रुजतीलही या जाणीवेतून हे नाटक उभं राहिलं आहे. ‘मला वेड लागले संतांचे’ हे नाटक संगीतप्रधान आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, एकनाथ, रामदास, तुकाराम, गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा या सर्व संतांच्या रचना गायन आणि नाट्याच्या माध्यमातून साकारल्या आहेत. संतांच्या रचनेबरोबरचं हृषिकेश परांजपे यांनी गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा या संतांवर स्व: गीत रचनाही केल्या आहेत.
संतांची तत्त्वं कालातीत आहेत. ती एकनाथांच्या क्रोधावरील ताबा ते साईबाबांनी दिलेला श्रद्धा-सबुरीचा मंत्र कोणत्याही काळात उपयोगी पडणारा आहे. हाच महत्त्वाचा संदेश त्यागराज खाडीलकर यांनी या नाटकातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी सज्ज आहेत.