पुणे : अभिजात भाषेच्या दर्जात बसू शकणार्या मराठी भाषेच्या निर्मितीसंबंधीची व इतिहासाची माहिती तरुण वर्गापर्यंत पोचवली, तर मराठीचे पालनकर्ते असणार्या शिक्षणसंस्था तरुण वर्गातील आत्मविश्वास वाढवतील व मराठीची पताका तितक्याच आत्मविश्वासाने विश्वभर नेतील, असा विश्वास साहित्यिक झुंजार सावंत यांनी त्यांच्या अध्यक्षिय मनोगतात व्यक्त केला.
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डी. वाय. पाटील विद्यापीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी शाखेच्या वतीने एक दिवसीय समंलनपूर्व संमेलानात ते बोलत होते. उत्तम मराठी तरुणांपर्यंत पोचवण्यासाठी उत्तम शिक्षक निर्माण होणे आवश्यक आहे. ज्ञानाची पूजा करणारी आपली संस्कृती असतानाही केवळ पैसा मिळवावा अशी धारणा पालकांमध्ये व त्यातून त्यांच्या पाल्यांमध्ये निर्माण होते. यापलिकडे सीए किंवा इंजिनीयर होण्यापेक्षा आपला मुलगा उत्तम शिक्षक व्हावा असे कुणालाही वाटत नाही. मराठीचा विकास महानुभवांच्या काळात झाला तसेच तेव्हा गद्यशास्त्र हे व्याकरणही लिहिले गेले हेच आज शिकवले जात नाही. कारण ते शिकवणार्यांनाच माहित नसल्यची खंत सावंत यांनी व्यक्त केली.
सेंसार बोर्डाच्या माजी अध्यक्षा अपर्णा मोहिले म्हणाल्या की, ज्ञानेश्वरी सांगणारे संत ज्ञानेश्वर तरुण होते. म्हणूनच त्यांनी ऐसी अक्षरे रसिके मेळवीन अशी अमृताची भाषा असणार्या रसाळ मराठीचे वर्णन केले. आजचा तरुण हा वाईट नसून बुद्धीमान आहे व उद्या तो कम्प्युटरवरही मराठी अधिक मोठ्या प्रमाणात वापरेल. त्यासाठी मराठी भाषेला आपण सर्वांनीच नीट वळण लावायला हवे.
मराठी भाषा ही इतर भाषांप्रमाणे बदलत असून भाषेचे संरक्षण व जतन व्हायला हवे, असे धनंजय पिसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, मराठी भाषा तरुण वर्गापर्यंत जाण्यासाठी साहित्यप्रकि‘येत साहित्यिकांबरोबर वाचकालाही महत्त्व दिले पाहिजे. आज मराठीची आवस्था वाईट नसून वॉट्स ऍपवर मराठीतून मोठ्या प्रमाणावर सुसंवाद होताना दिसतो.
मराठी भाषा शिकण्याबाबत व तिचा प्रसार करण्याबाबत तरुण वर्ग कमी पडत असल्याची खंत डॉ. पांडूरंग भानूशाली यांनी व्यक्त केली. १२०० वर्षांहून अधिक दीर्घ परंपरा असणारी मराठी मराठी संतांनी मोठी व दिव्य केली, तर मर्ढेकरांनी तिला नवतेचे देणे दिले. अशा समृद्ध परंपरेचे पुढे काय होईल याची चिंता वाटते. कारण साहित्य संमेलने व एम ए मराठी शिकणार्यांपलीकडे ही भाषा जात नाही. वैश्विकतेचा संदेश देणारे ज्ञानेश्वर आणि आजच्या जागतिकीकरणातील जीवनविषयक दृष्टी यात मोठी तफावत आहे. यातून मराठी तरुणापुढे कोणताच आदर्श ठेवलेला दिसत नाही. तो मराठी वाड़्मय वाचत नाही. यासाठी तरुणांमध्ये मराठी भाषा कशी वाढेल यावर संशोधनात्मक काम व्हायला हवे.
संमेलनपूर्व संमेलनात कथाकथन, नाट्यछटा, कामगार आणि साहित्य यावर चर्चासत्र, स्थानिक कवींचे कवीसंमेलन आणि गजल मुशायराचा कार्यक‘म सादर करण्यात आला.

