मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता आपल्या पक्षाचे मुखपत्र काढणार असून ‘मराठा’ नावाने हे मुखपत्र प्रकाशित होणार असल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे स्वतः या मुखपत्राचे संपादक होणार असून राज ठाकरेंच्या या नव्या गोष्टीकडे सर्वांचेलक्ष लागण्याची शक्यता आहे. मनसेचे मुखपत्र ‘मराठा’ सुरु झाल्यानंतर शिवसेनेसमोर एक नवे आव्हान उभे राहाणार आहे.महापालिका निवडणुकीत ‘मराठा’ विरुद्ध ‘सामना’ असा नवा संघर्ष पाहायला मिळतो काय? हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःवर होणा-या टीकेचे उत्तर देण्यासाठी मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक आणि सामना हे वृत्तपत्र सुरु केले होते. बाळासाहेबांचे सडेतोड विचार शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यात या दोन्ही माध्यमांनी मोलाची भूमिका बजावली होती. बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे हेदेखील पक्षाचे मुखपत्र काढणार आहेत. ‘मराठा’ हे आचार्य अत्रे यांनी सुरु केलेले अग्रगण्य दैनिक होते.संयुक्त महाराष्ट्र लढ्यात आचार्य अत्रेंनी मराठामधून घणाघात केला होता. पण आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर हे दैनिकही बंद पडले. राज ठाकरेंनी आचार्य अत्रे यांच्या कन्येकडून ‘मराठा’ नावाचे कायदेशीर हक्क मिळवत याच नावाने दैनिक काढण्याची तयारी सुरु केली आहे. मराठा हे मनसेचे मुखपत्र असेल असे सूत्रांनी सांगितले