मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज येथील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाजवळ आयोजित मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री संजय सिरसाट, अतुल सावे, सुभाष झांबड, भाऊसाहेब चिकटगावकर, नारायण कुचे, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, विविध स्वातंत्र्यसैनिक, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत चौधरी, महापालिका आयुक्त डॉ. प्रकाश महाजन, जिल्हा पोलीस अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.
ध्वजारोहणापुर्वी मुख्यमंत्री फडणवीस, विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यासह विविध मान्यवरांनी सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पोलीस दलातील जवानांनी हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस हुतात्म्यांच्या बलीदानाचे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा आहे. स्वातंत्र्य हे खडतर संघर्षातून मिळाले आहे याची आठवण आपल्याला आणि नवीन पिढीला करुन देण्याचा हा प्रसंग आहे. ज्यांना इतिहासाचा विसर पडतो त्यांना वर्तमानकाळ असतो मात्र भविष्यकाळ नसतो असे उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर नेतृत्वाचा आदरपूर्वक उल्लेख केला आणि या मुक्ती संग्रामाचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्व तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेत मराठवाड्याची महत्वपूर्ण भूमिका या बाबी नमूद केल्या.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, गेली तीन वर्ष मराठवाडा विभाग दुष्काळाला तोंड देत आहे. यंदा या भागातील परिस्थितीची दाहकता आपण दौरा करुन अनुभवली आहे. या परिस्थितीवर शासनाने उपाय योजले आहेत. पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहे. चारा टंचाई असलेल्या भागात गुरांसाठी छावण्या उभारण्यात आल्या आहेत. रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. शेतकऱ्यांसाठी विनाअट अन्न सुरक्षा योजना राबविली जात असून या योजनेत माफक दरात अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जात आहे. मात्र मराठवाड्यातील दुष्काळाचे कायम स्वरुपी निर्मुलन आवश्यक असून दुष्काळाविरुद्ध निर्णायक लढा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाण्याचे विकेंद्रीत साठे विकसीत करणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून हे काम करणे शक्य आहे. गेल्या आठ- पंधरा दिवसात जेथे पाऊस झाला तेथे जलयुक्त शिवार योजनेचे यश समोर आलेले आहे. या विभागात या योजनेत जास्तीत जास्त कामे हाती घेणे आणि शेत तेथे शेततळे उभारण्याचा कार्यक्रम राबविणे हाच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी सरकार निधी उपलब्ध करुन देईल. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.
मराठवाड्यातील सामान्य माणसापर्यंत विकासाची प्रक्रिया पोहचणे आवश्यक आहे, अशा आशयाचे उद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले की, या भागातील प्रश्न मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी औरंगाबादेत राज्य मंत्री मंडळाची बैठक घेतली जाणार आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे चित्र मांडणाऱ्या स्मृती संग्रालयाच्या उभारणीचे त्यांनी कौतुक केले. या संदर्भातील प्रयत्नांबाबत त्यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना धन्यवाद दिले.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या.