पुणे : हरिणीच्या शिकारीला निघालेला वाघ एकीकडे भय तर दुसरीकडे शिकारीची ओढ, बेधुंद होऊन
धावणारया घोडयाची चपळ चाल, रूसलेल्या राधेची समजूत काढणारा कृष्ण, सर्व वाद्य शांत असताना केवळ
प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या ठेक्यावर ताल धरणारी पावले असे नृत्यातील नानाविध आविष्कारांचे सादरीकरण करून
पुण्यात प्रथमच आपली कला सादर करणारया प्रसिद्ध नृत्यांगना मनीषा मिश्रा यांनी उपस्थितांची मने जिंकली.
निमित्त होते आसावरी पाटणकर यांच्या उद्गार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आवर्तन’ या कथक
मैफलीचे. बाल शिक्षण मंदिर, कोथरुड येथील सभागृहात काल हा कार्यक्रम पार पडला.
नृत्य व हावभाव याची सुरेख गोफ विणून एक परिपूर्ण कलेचे दर्शन मिश्रा यांनी आपल्या नृत्यातून घडविले.
कला ही शिकून अथवा उपजत असली तरी दैवीदेणगी लाभलेल्या कलाकारांचे सादरीकरण त्या कलेस वेगळ्या
उंचीवर नेऊन ठेवते, असाच काहीसा प्रत्यय मिश्रा यांचे नृत्य पाहताना रसिकांना आला. ताल त्रिताल, थाट,
तिहाई, बंदिश अशा कथकमधील विविध प्रकारांचे त्यांनी सादरीकरण केले. प्रकार पारंपारिक असले तरी प्रत्येक
प्रस्तुतीस ख़ास ‘मनीषा मिश्रा टच’ होता. सादरीकरणाच्या शेवटच्या पर्वात वाद्याविना केवळ प्रेक्षकांच्या
टाळ्यांच्या ठेक्यावर ताल धरून त्यांनी अनोखी नृत्यप्रस्तुती सादर केली. त्यांच्या नृत्यास पं. रवीनाथ मिश्रा
(तबला), प्रवीण कश्यप (गायन), रोहित वनकर(बासरी), फारुक खान (सारंगी), अजय पराड(संवादिनी) यांनी
सुरेल साथ दिली.
या मैफलीत आसावरी पाटणकर यांची कन्या व शिष्या मुग्धानेही आपली कला सादर केली. दुर्गास्तुतीने तीने
आपल्या नृत्याची सुरुवात केली. ताल झप ताल, सिंहावलोकन, संगीत तुकडे, कालिया दमन यासारख्या प्रसिद्ध
नृत्य प्रकारांचे मुग्धाने सादरीकरण केले. पं. रोहिणीताई भाटे यांची नृत्यरचना असणारया ‘काहे रोकत डगर
प्यारे..’ ही ठुमरीही प्रस्तुत केली. यास रसिकांनी भरभरून दाद दिली. तिहाई या प्रकाराने तीने आपल्या
नृत्यप्रस्तुतीची सांगता केली. वयाने व अनुभवाने लहान असली तरी आपले नवखेपण नृत्यातून दर्शवू न देता
अत्यंत सुरेख नृत्यप्रस्तुती सादर करून मुग्धाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तीच्या नृत्यास पं. अरविंदकुमार
आजाद (तबला), आसावरी पाटणकर, सुरश्री जोशी (गायन), रोहित वनकर(बासरी), फारुक खान (सारंगी), अजय
पराड(संवादिनी) यांनी सुरेल साथ दिली. नृत्य, वादन आणि गायन यांच्या अनोख्या मिलाफातून रंगलेली
‘आवर्तन’ मैफल रसिक पुणेकरांसाठी अविस्मरणीय संध्या ठरली. गुरु पं. रोहिणीताई भाटे यांच्या स्मरणार्थ या
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.