पुणे :
विधानसभा निवडणुकीत पुण्यातील सर्व मतदारसंघांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सपशेल पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या ‘राजमहाल’ या निवासस्थानी कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय कार्यकर्त्यांशी समोरासमोर संवाद साधला. यावेळी राज यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. पक्षाचा झालेला पराभव त्यांनी गांभीर्याने घेतला असून, लवकरच शहर कार्यकारणीत बदल करण्याचे संकेत आज दिले.
राज ठाकरे सध्या पुणे मुक्कामी आहेत. शहरात मनसेची मोठी ताकद आहे. पक्षाचे २९ नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून आले होते. तरीही मनसेचा एवढा मोठा पराभव कसा झाला, याची कारणे राज यांनी कार्यकर्त्यांशी बोलून जाणून घेतली. पुण्यातील पराभवाबाबत खूप लोकांचे फोन, पत्र, निरोप आले होते. या सर्व लोकांना मुंबईला बोलावणे ठीक नव्हते. त्यामुळे आपणच पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ४ – ५ वर्षांपूर्वीही अशाच प्रकारच्या कार्यकर्त्यांशी गाठी-भेटी घेतल्या होत्या.
आपल्या पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवकांनी इतर पक्षांचे कसे काम केले? गडबड कोणी केली? नुकसान कोणी केले? जुने पदाधिकारी काम करीत नाही का? अशा विविध प्रश्नांची माहिती राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी बोलून घेतली. पक्षाचे नुकसान करणार्या पदाधिकार्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. इतरांची गाळणी ठेवण्यापेक्षा कार्यकर्त्यांशी समोरासमोर चर्चा सुरू आहे. कोथरूड, हडपसर, पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, विधानसभा मतदारसंघांतील आढावाही घेण्यात येणार आहे. मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित आले होते. बर्याच वर्षांंनंतर हे दोघे भाऊ एकत्रित आल्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारणा केली असता, मराठी माणसाच्या हितासाठी दोघांनीही एकत्रित येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचाही एक मतप्रवाह पक्षात आहे. असे असतानाही मनसेची स्थापना झाल्यापासून पुणेकरांनी पक्षाला मोठी साथ दिली आहे. २00७ च्या पुणे महापालिका निवडणुकीत पक्षाचे केवळ ८ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २0१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. विरोधी पक्षनेतेपदही मिळाले होते. तरीही पक्षाचा ज्या प्रमाणात महापालिकेत ठसा उमटायला हवा होता, तो दिसून आला नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी थेटपणे कार्यकर्त्यांंशी संवाद साधला. त्यामुळे कार्यकर्त्यांंचा आत्मविश्वास कमालीचा वाढल्याचे दिसून आले. पक्षाचा पराभव झाला असला तरी यापुढील काळात आणखी जोमाने काम करणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांंनी बोलून दाखविला.